पर्थ : डेल स्टेन दुखापग्रस्त झाला तरी वर्नोन फिलँडरच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आॅस्ट्रेलियाला पहिल्या डावात केवळ दोन धावांची नाममात्र आघाडी मिळविता आली. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात २ बाद १०४ धावांची मजल मारत पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वर्चस्व गाजविले. स्टार वेगवान गोलंदाज स्टेन दुखापतग्रस्त झाला असला तरी, दक्षिण आफ्रिका संघ या लढतीत पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला. गुरुवारच्या बिनबाद १०५ धावसंख्येवरून पुढे खेळणाऱ्या आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव २४४ धावांत संपुष्टात आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात १०२ धावांची आघाडी घेतली होती व त्यांच्या ८ विकेट शिल्लक होत्या. जेपी ड्युमिनी (३४) आणि डीन एल्गर (४६) खेळपट्टीवर होते. सलामीवीर स्टिफन कुकला (१२), पीटर सिडलने तर हाशिम अमला (१) याला हेजलवूडने माघारी परतविले. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात २४२ धावांची मजल मारली होती. आॅस्ट्रेलियाची सकाळी बिनबाद १५८ अशी दमदार स्थिती होती; पण त्यानंतर ८६ धावांच्या अंतरात त्यांनी १० विकेट गमावल्या. आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावातील धावसंख्येच्या आधारावर दोन धावांची आघाडी घेतली. उपाहारापूर्वी वॉर्नर बाद झाल्यानंतर आॅस्ट्रेलियाचा संघ दडपणाखाली आला. त्यानंतर त्यांनी २३ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट गमावल्या. वॉर्नर वाका मैदानावर कसोटी कारकिर्दीतील चौथ्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना, स्लिपमध्ये तैनात अमलाकडे झेल देत माघारी परतला. त्यानंतर आॅस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाली. (वृत्तसंस्था)
द. आफ्रिकेचे दमदार उत्तर
By admin | Published: November 05, 2016 5:30 AM