ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 4 - भारतीय फुटबॉलसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला. कारण फिफाच्या जागतिक क्रमवारीत तब्बल 21 वर्षांनंतर भारतीय संघानं टॉप-100 मध्ये स्थान मिळवलं.
जागतिक फुटबॉल महासंघाने आज जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये भारतीय संघाने बरोबर 100 वं स्थान मिळवलं. भारतासोबत निकारागुआ, लिथुआनिया आणि इस्टोनिया हे संघ देखील संयुक्तपणे या स्थानावर आहेत. तर आशियाई क्रमवारीत भारतानं आपलं अकरावं स्थान कायम राखलं आहे.
स्वातंत्र्यानंतर फिफाच्या क्रमवारीत पहिल्या शंभर संघांमध्ये स्थान मिळवण्याची भारताची ही केवळ सहावी वेळ आहे. फिफा क्रमवारीतली भारताची सर्वोत्तम कामगिरी 94 व्या स्थानाची आहे. फेब्रुवारी 1996 मध्ये फिफा क्रमवारीत भारताने 94 वं स्थान गाठलं होतं. याचवर्षी एप्रिल महिन्यात भारताची 100 व्या स्थानावर घसरण झाली होती. त्यानंतर आता तब्बल 21 वर्षांनी भारतीय संघ पुन्हा शंभराव्या स्थानावर दाखल झाला आहे.