नागपूर : जसप्रित बुमराहच्या २९ धावांतील ६ बळींच्या जोरावर गुजरातने तब्बल ६६ वर्षानंतर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. व्हीसीएच्या सिव्हिल लाईन्स स्टेडियमवर झालेल्या पाच दिवसांच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी बुधवारी झारखंडला विजयासाठी २३५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण गुजरातपुढे त्यांनी दुसऱ्या डावात १११ धावांत नांगी टाकताच पराभव पत्करावा लागला.गुजरातने याआधी १९५०-५१ मध्ये एकदाच रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली होती. पण त्यावेळी झालेल्या अंतिम सामन्यात तत्कालीन होळकर संघाकडून(सध्याचा मध्य प्रदेश संघ) पराभवाचे तोंड पहावे लागले होते.गुजरातने सकाळी ४ बाद १०० वरून पुढे खेळ सुरू केला. त्यांचा दुसरा डाव २५२ धावांत आटोपताच झारखंडला विजयासाठी २३५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पहिल्यांदा रणजी करंडकाचा उपांत्य सामना खेळणारा झारखंड संघ हे आव्हान देखील पूर्ण करू शकला नाही. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या झारखंडच्या फलंदाजांनी गुजरातच्या माऱ्यापुढे गुडघे टेकले. त्यांचा दुसरा डाव ४१ षटकांत १११ धावांत संपुष्टात आला. दोन्ही सलामीवीर भोपळा न फोडताच परतले. केवळ पाच फलंदाज दुहेरी आकडा ओलांडण्यात यशस्वी ठरले. त्यात कुशालसिंग याने सर्वाधिक २४ धावा केल्या. एकाही जोडीला मोठी भागीदारी करता न आल्याने पाठोपाठ गडी गमावताच पराभवावर शिक्कामोर्तब झाले. गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलने केवळ तीनच गोलंदाजांचा शिताफीने उपयोग केला. बुमराहने १४ षटकांत २९ धावा देत सहा फलंदाजांना बाद करताना कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्याने या सामन्यात एकूण ७ गडी बाद केले. तसेच, पहिल्या डावात सहा गडी बाद करणारा वेगवान गोलंदाज आर. पी. सिंग याने दुसऱ्या डावातही तीन गडी टिपले. हार्दिक पटेल याने एक गडी बाद केला. गुजरातने सकाळी दुसऱ्या डावात ६ गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावांची भर घातली. (वृत्तसंस्था)
गुजरात ६६ वर्षांनंतर फायनलमध्ये
By admin | Published: January 05, 2017 2:19 AM