नवी दिल्ली : तब्बल चार तास चाललेल्या लढतीनंतर अखेर टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडू आणि अव्वल मानांकित स्पेनच्या राफेल नदालला पराभवाचा धक्का बसला आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नदालला डॉमिनिक थिआमने पराभूत करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
सुरुवातीपासूनच रंजकदार ठरलेल्या या सामन्यात थिआमने नदालवर 7-6 7-6 4-6 7-6 असा विजय मिळवला. या सामन्याच्या पहिलाच सेट टायब्रेकरमध्ये गेला. या टायब्रेकरमध्ये थिआमने बाजी मारली आणि नदालला पहिला धक्का बसला.
दुसऱ्या सेटमध्ये नदाल पुनरागमन करत असेल, असे काही जणांना वाटले होते. पण हा सेट पुन्हा एकदा टायब्रेकरमध्ये गेला. दोघांचीही ६-६ अशी बरोबरी झाली होती. पण त्यानंतर थिआमने पुन्हा एकदा टायब्रेकर जिंकत सामन्यात २-० अशी आघाडी मिळवली होती.
हा सामना आता नदाल गमावणार का, असे काही जणांना वाटत होते. कारण तिसरा सेट गमावल्यावर नदालचे आव्हान संपुष्टात येणार होते. पण नदालने तिसरा सेट जिंकला आणि आपले आव्हान जीवंत ठेवले. चौथा सेटही चांगलाच गाजला. कारण या सेटमध्येही दोघांची ६-६ अशी बरोबरी झाली आणि सामना टायब्रेकरमध्ये गेला. टायब्रेकरमध्येही दोन्ही खेळाडूंचा कस पणाला लागला होता. पण हा टायब्रेकर पुन्हा एकदा थिआमने ८-६ असा जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.