- जयंत कुलकर्णीजालना : ‘राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला विशेष ठसा उमटवला, तरच खेळाडूंना प्रायोजक मिळतात; परंतु खऱ्या अर्थाने प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असणाºया प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडूंनाच त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत आर्थिक पाठिंब्याची आवश्यकता असते,’ असे मत ‘रुस्तम-ए-हिंद’ व ‘महाराष्ट्र केसरी’ किताबांचा मानकरी अमोल बुचडे याने व्यक्त केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडविण्यासाठी १० वर्षांपुढील प्रतिभावान खेळाडूंच्या गुणवत्तेला आकार देण्यासाठी प्रदीर्घ आराखडा आखून त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे अमोल बुचडेला वाटते.अमोलने २०१० साली पंजाबच्या जरखड येथे रुस्तम-ए-हिंदचा किताब पटकावला होता. तसेच याच वर्षी तो बारामती येथे महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला होता. जालना येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त त्याने ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.महाराष्ट्रातील बरेच मल्ल महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यावरच बºयाचदा समाधान मानतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याविषयी त्यांच्या मनात विचार येत नाही याविषयी तो म्हणाला, ‘आर्थिक स्थिती प्रतिकूल असणे, खेळण्यासाठी पोषक वातावरण नसणे आणि कौटुंबिक अडचण अथवा दुखापतीमुळे अनेक मल्लांना महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर खेळ थांबविणे भाग पडते. त्याचप्रमाणे एकदा महाराष्ट्र केसरी झाला की त्याच दर्जाची कामगिरी व्हायला पाहिजे ही मल्लाची इच्छा असते. फक्त महाराष्ट्र केसरी किताबावरच थांबण्याची त्याची स्वत:ची तशी कधीही वैयक्तिक इच्छा नसते. प्रत्येकाचीच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असते. आता ट्रेंड बदलत आहे. आता मल्ल फक्त एकदाच महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यावर समाधान मानत नाही. त्यांचे ध्येय हे तीनदा महाराष्ट्र केसरी होण्याचे आहे. मीदेखील महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर खेळलो आहे.’खेळाडूंना योग्य वयात प्रायोजक मिळत नसल्याची खंत अमोलने व्यक्त केली. अमोल यावेळी म्हणाला, ‘एक दर्जेदार मल्ल घडविण्यासाठी खूप आर्थिक खर्च असतो. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील मल्लांच्या खुराकासाठी किमान १ लाख व राज्य पातळीवरील मल्लांसाठी ५० हजार व सर्वसाधारण मल्लांसाठी २५ हजार रुपयांचा खर्च लागतो.’त्याचप्रमाणे, ‘नवोदित गुणवान मल्लांच्या गुणवत्तेला आकार देण्यासाठी व त्यांचा पाया भक्कम करण्यासाठी प्रायोजकाची गरज असते. तज्ज्ञ व मार्गदर्शकांचा सल्ला घेऊनच त्या खेळाडूला प्रायोजकत्व द्यायला हवे. मीदेखील माझ्या अकादमीत उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले आहे,’ असेही अमोल यावेळी म्हणाला.महाराष्ट्राला मिळेल आॅलिम्पिकमध्ये पदकखाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला आॅलिम्पिक मेडल मिळविण्याची धमक गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे यांच्यात असल्याचे अमोल बुचडे याने आवर्जून सांगितले.
यश मिळाल्यानंतरच गुणवान मल्लांना मिळतात ‘प्रायोजक’, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे याने व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 4:51 AM