हैदराबाद - हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पण, या कृत्याचा संपूर्ण देशभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत केंद्र सरकारनं काही ठोस पाऊल उचलावी अशी मागणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह यांच्याकडे अनेक युवक-युवतींनी हैदराबाद प्रकरणातील नराधमांवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशा विनंतीचे पत्र येत आहेत.
महाराष्ट्राची सुन आणि दिग्गज नेमबाज हीना सिधू -पंडित हीनं गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे एक मागणी केली आहे. देशातील प्रत्येक महिलेला शस्त्र बाळगण्याचा परवाना द्या, अशी विनंती तिनं अमित शाहकडे केली आहे. हिनानं महिलांवर होत असलेल्या अत्याचारावर तीव्र नाराजी प्रकट केली आहे. बुधवारी तिनं सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणारी पोस्ट केली.
ती म्हणाली,''देशातील प्रत्येक महिलेला शस्त्र परवाना द्यावा आणि शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मी गृह मंत्री अमित शाह यांना करते. शस्त्र परवाना देणे ही समस्या बनणार नाही. आम्हाला देशात प्रवास करताना, कामावर जाताना सुरक्षित वाटायला हवं. आम्हाला आमची सुरक्षा स्वतः करायची आहे, कारण पोलीस योग्य वेळी पोहचू शतक नाहीत. त्यामुळे जेव्हा एखाद्या मुलीवर सामुहिक अत्याचार होणार असेल, तेव्हा पिस्तुलच तिला वाचवू शकते.''
पत्रातील मजकुराचा सारांश असा : मा. प्रधानमंत्री, स्वातंत्र्य मिळून आता ७३ वर्ष झाले असून आपण विविध क्षेत्रात आमुलाग्र प्रगती केली आहे. मात्र, आजही देशात महिलांसाठी आपण सुरक्षित वातावरण निर्माण करू शकलो नाही. हैद्राबाद येथील बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर जनतेच्या मनात तीव्र राग आहे. प्रत्येकजण तुम्ही यावर काय बोलणार याची वाट पाहत आहे. आपण तरुणांना उद्याचे भविष्य असे म्हटले आहे. हिच तरुणाई आपल्याला विनंती करत आहे की, अशा गुन्ह्यात कडक कायद्याची अंमलबजावणी करून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी. आम्ही आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत.