बेंगळुरू : जिम सत्रात झालेल्या चुकीमुळे मिडफिल्डर रिनाची कारकीर्द संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर होती, पण डोळ्यावरील दोन शस्त्रक्रिया आणि खेळापासून एक महिना दूर राहिल्यानंतर तिला टोकियो आॅलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघात निवडीची आशा आहे.२०१७ मध्ये पदार्पणानंतर रिना भारतीय संघाची नियमित खेळाडू झाली. तिने आपल्या कणखर मानसिकतेच्या जोरावर आव्हानांना सामोरे जाताना पुनरागमन केले.
रिनाने सांगितले की, ‘मी सोप्या एक्झरसाईज करण्यासाठी ‘स्ट्रेच-बँड’चा वापर करीत होते, पण बँड सुटून माझ्या डाव्या डोळ्यावर आदळला. हे एवढे झटपट झाले की मला प्रतिक्रिया देण्यास वेळच मिळाला नाही. त्यावेळी मला वाटले की पुढील चार महिन्याचा कालावधी माझ्या जीवनातील सर्वांत वाईट कालावधी राहील.’
आशियन गेम्स २०१८ मध्ये रौप्यपदक पटकाविणाऱ्या संघाची ती सदस्य होती. त्याचसोबत ती त्याचवर्षी एफआयएच महिला विश्वकप स्पर्धेत खेळली. २०१९ मध्ये झालेल्या या घटनेपूर्वी तिची कामगिरी चांगली होती, पण या दुखापतीमुळे तिच्या आॅलिम्पिक क्वालिफायरमध्ये सहभागी होण्याबाबत साशंकता निर्माण झाली.
चंदीगडची ही २६ वर्षीय खेळाडू म्हणाली, ‘सुरुवातीला डॉक्टरांनी सांगितले की, यातून लवकर सावरता येईल, पण महिनाभरानंतरही वेदना कायम होत्या. डॉक्टरांनी त्यानंतर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्यामुळे रेटिनाचे संक्रमण रोखता येईल. हे निराशाजनक वृत्त होते आणि मला पुन्हा हॉकी खेळता येईल की नाही, याचा विचार करीत होते.’ ब्रेकनंतर ती जुलैमध्ये राष्ट्रीय शिबिरात दाखल झाली.