WBC 2023, Nikhat zareen । मुंबई : सध्या भारतात जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा थरार रंगला आहे. भारताची स्टार महिला बॉक्सर निखत झरीनने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे. तिने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत 50 किलो वजनी गटात ही किमया साधून तिरंग्याची शान वाढवली. भारताच्या निखतने या वजनी गटात व्हिएतनामच्या एनगुएन थि ताम हिला 5-0 असे नमवत सुवर्णपदकावर नाव कोरले.
निखत झरीनचे सोनेरी यश खरं तर या स्पर्धेतील निखतचे हे दुसरे विजेतेपद आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन विजेतेपदे पटकावणारी निखत ही दुसरी भारतीय महिला बॅक्सर ठरली आहे. यंदा या स्पर्धेत आतापर्यंत भारताच्या तीन महिला बॉक्सरनी सुवर्णपदावर नाव कोरले आहे. निखतच्या या सोनेरी यशानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
सलमान खानने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "जेव्हा तू मला शेवटची भेटली होतीस तेव्हा तू मला प्रॉमिस केले होते की तू पुन्हा जिंकशील आणि तू ते केलेसच. निखतचा खूप अभिमान वाटतो. महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन."
निखत झरीन आणि एनगुएन थि ताम यांच्यामधील अंतिम लढतीतील पहिली फेरी रोमांचक झाली. त्यात रेफरींनी सर्वसहमतीने निकहतला पॉईंट दिले. व्हिएतनामी बॉक्सरने दुसऱ्या राऊंडमध्ये निकहतला पुन्हा कडवी टक्कर मिळाली. त्यानंतर प्रतिस्पर्धी बॉक्सरने हा राऊंड 3-2 अशा फरकाने जिंकला. अंतिम फेरीही अटीतटीची झाली. मात्र त्यात निखतने बाजी मारत सामना आपल्या नावावर केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"