नवी दिल्ली : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने आपला विजयरथ कायम ठेवून आणखी एक पदक मिळवले आहे. नीरज चोप्राने वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Atheletics Championships) रौप्य पदक मिळवल्याने देशभर आनंदाचे वातावरण आहे. लक्षणीय बाब म्हणजे त्याने चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवून भारताचा १९ वर्षांचा दुष्काळ मिटवला आहे. २४ वर्षीय नीरजने केलेल्या कारनाम्यामुळे त्याच्या कुटुंबियांसह देशभरातील प्रत्येक नागरिकाला आनंद झाला आहे. त्याच्या गावातील लोकांनी देखील डान्स करून आनंद व्यक्त केला आहे, तो हरियाणामधील पानीपत येथील रहिवासी आहे.
नीरजच्या आईने केला डान्स
दरम्यान, गावकऱ्यांसोबत नीरजच्या घरच्यांनी देखील डान्स केला आणि आनंद साजरा केला आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये नीरजची आई सरोज देवी यादेखील डान्स करताना दिसत आहेत. नीरजच्या आईने सांगितले, "मला पूर्ण आशा होती की माझा मुलगा नक्की पदक मिळवेल. त्याने पूर्ण तयारी केली होती. नीरजने आपल्या भारत देशाचे नाव रोशन केल्याचा मला आनंद आहे."
नीरजच्या गावातील लोकांनी त्याच्या घरी गर्दी केली असून त्याच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. नीरजचे वडील सतीश कुमार यांनी एका वृत्तवाहिनीशा बोलताना म्हटले, "नीरजने एका चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. मला याचा खूप आनंद आहे. हा एक मोठा विजय आहे, कारण चॅम्पियनशिपमध्ये देशाला आतापर्यंत केवळ एक पदक मिळाले होते. आता त्यात आणखी एकाची भर पडली आहे. तो पुढील स्पर्धेत देखील चांगली कामगिरी करेल अशी आम्हाला आशा आहे." विशेष म्हणजे नीरज या महिन्याच्या २८ तारखेपासून इंग्लंडमधील बर्मिंहगॅम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी जाणार आहे.
१९ वर्षांनंतर भारताला मिळाले पदकवर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला तब्बल १९ वर्षांपूर्वी २००३ मध्ये पहिले पदक मिळाले होते. २००३ मध्ये लॉन्ग जम्पमध्ये मिळालेल्या पदकानंतर भारत आपल्या दुसऱ्या पदकाच्या प्रतीक्षेत होता. मात्र आज नीरज चोप्राने तमाम भारतीयांचे स्पप्न पूर्ण केले आहे. २००३ मध्ये भारताची स्टार अॅथलीट अंजू बॉबी जॉर्जने पहिले पदक जिंकले होते, तिने महिलांच्या लांब उडीत कास्यंपदक पटकावले होते.
नीरजची आतापर्यंतची 'सुवर्ण' कामगिरी जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा - सुवर्णपदकआशियाई स्पर्धा २०१८ - सुवर्णपदक राष्ट्रकुल स्पर्धा - सुवर्णपदकटोकियो ऑलिम्पिक २०२० - सुवर्णपदकजागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा २०२२ - रौप्यपदक