ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ : भारतीय संघाचे कर्णधार पद म्हणजे नाव, प्रतिष्ठा, संपत्ती, अमाप लोकप्रियता आणि देवपणही असे समीकरणच. मात्र काटेरी मुकुट असलेले कर्णधार पद आणि शेवटही काटेरीच असा इतिहासच आहे. भारत ११ जून पासून झिम्बाब्वे दौऱ्यावर जात आहे. २००५ मध्ये सौरव गांगुली करणधार असताना झिम्बाब्वे दौरा त्याच्या करणधार पद आणि करीयर साठी शेवटचा ठरला होता. त्याचीच आवृती धानीच्या बाबतीत होऊ शकते का ? असे क्रिकेट वर्तुळात बोलले जात आहे.
२००३ च्या विश्वचषकानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल यांची नियुक्ती करण्यात आली. २००५ मध्ये चॅपेल यांनी संपूर्ण ताकद लावून गांगुलीला बाहेरचा रस्ता दाखविला. चॅपल आणि गांगुली यांच्यातील वाद जगजाहीर होता. त्यावेळी चॅपल यांनी गांगुली ऐवजी द्रविड आणि सचिनला कर्णधारपदासाठी पसंती दिली होती. भारतीय संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी नुकतच सर्व प्रकारच्या कर्णधारपदासाठी विराट कोहलीच्या नावाचं समर्थन केलं आहे. त्यामुळे धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाला एक पराभव पत्करावा लागला तरी धोनीच्या नेतृत्वावर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले जातील, असं क्रिकेट तज्ञांचं म्हणणं आहे.
त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यानंतर धोनीचाही गांगुली होणार का, या चर्चेने आता जोर धरला आहे. कारण भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या करिअरमध्ये झिम्बाब्वे दौरा हा त्याचा कर्णधार म्हणून शेवटचा दौरा ठरला होता. त्यावेळी देखील संघाच्या प्रशिक्षकांनी कर्णधार बदलण्याची शिफारस केली होती.
2005 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यात भारताने 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली होती. गांगुलीने झिम्बाब्वे दौऱ्यात पहिल्याच सामन्यात शतक झळाकावून चॅपल यांना चांगलच उत्तर दिलं होतं. शिवाय दोन्ही मालिका आपल्या नावावर केल्या होत्या. प्रशिक्षक चॅपेल यांनी भारतात परत आल्यानंतर बीसीसीआयला मेल करुन एक शिफारस केली, ज्यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली होती. चॅपेल यांच्या शिफारशीनंतर गांगुलीला कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं आणि राहुल द्रविडकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती.
भारताचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याची सध्याची परिस्थिती देखील गांगुलीच्या झिम्बाब्वे दौऱ्याप्रमाणेच आहे. संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनी ऐवजी विराट कोहलीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधार करण्याची मागणी केली आहे. शास्त्री यांनी धोनीला खेळाचा आनंद घेण्याचा सल्ला दिला आहे. धोनीने आगामी दौऱ्यात चांगलं प्रदर्शन न केल्यास बीसीसीआयला धोनीला कर्णधारपदावरुन दूर करण्यासाठी चांगलं कारण मिळू शकतं, असं क्रिकेट तज्ञांचं म्हणणं आहे.