Neeraj Chopra Skydiving: भारताला ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत पहिलंवहिलं सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचलेला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. मालदिवमध्ये शांत अन् निळ्याभोर समुद्राचा आनंद घेतल्यानंतर नीरज सध्या दुबईत धमाल मस्ती करताना पाहायला मिळतो आहे. नीरजनं नुकतंच दुबईत 'स्काय डायव्हिंग'चा आनंद लुटला. त्याचा एक व्हिडिओ देखील त्यानं इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
"विमानातून उडी घेतल्यानंतर सुरुवातीला थोडी भीती वाटली खरी पण नंतर खूपच मजा आली", अशा मथळ्यासह नीरजनं स्काय डायव्हिंगचा जबरदस्त व्हिडिओ पोस्ट केला आहे. नीरजनं आपल्या फॅन्ससोबत स्काय डायव्हिंगचा आनंद शेअर करताना हा थरारक अनुभव आयुष्यात एकदा तरी नक्कीच करुन पाहा असं आवाहन देखील केलं आहे.
नीरज चोप्रानं त्याचे प्रशिक्षक क्लाऊस बार्टोनिट्झ यांचं कौतुक करत आगामी २०२४ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी देखील त्यांच्याच अधिपत्याखाली प्रशिक्षण घ्यायला आवडेल असं शुक्रवारी म्हटलं होतं. एका इंग्रजी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नीरजनं प्रशिक्षकांचं कौतुक करताना ही माहिती दिली होती. जेव्हा एखाद्या खडतर प्रशिक्षणातून तुम्ही पूर्ण थकून गेलेले असता अशावेळी एखादा जोक सांगून वातावरण खेळतं ठेवण्याची बार्टोनिट्झ यांची सवय मला खूप आवडते, असं नीरजनं म्हटलं होतं.
"काही प्रशिक्षक हातात अगदी काठी घेऊन तुमच्या मागे उभे असतात आणि तुम्हाला प्रशिक्षण देतात. पण क्लाऊस सर तसे नाहीत. ते वेगळे आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या सीरिअस सेशनमध्ये सहभागी झालेले असता तेव्हाच काहीतरी जोक सांगून वातावरण हलकं करण्याची त्यांची पद्धत खूप धमाल आहे. त्यांच्या प्रशिक्षण पद्धतीची मला सवय झाली आहे. त्यांच्यासोबत माझं उत्तम समन्वय झालंय. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही त्यांच्याच अधिपत्याखाली मला प्रशिक्षण घ्यायला आवडेल", असं नीरज चोप्रा म्हणाला.