दुबई : वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा ३-0 असा सफाया करणाऱ्या भारतीय संघाने एकदिवसीय टीम रँकिंगमध्ये आज आपले दुसरे स्थान कायम ठेवले आहे. भारताचे ११५ गुण झाले असून, ते अव्वलस्थानी असणाऱ्या आॅस्ट्रेलियापासून अजूनही १४ गुणांनी पिछाडीवर आहेत. आॅस्ट्रेलियाचे १२९ गुण आहेत.दरम्यान, बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-१ अशा विजयासह त्यांच्या भूमीवर सलग तिसरी मालिका जिंकल्यामुळे त्यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २0१७ च्या क्वॉलिफिकेशनसाठी आपला दवा मजबूत केला आहे. दक्षिण आफ्रिकेवरील विजयामुळे ते सातव्या स्थानी आले आहेत. वनडे फलंदाजी क्रमवारीत विराट कोहली (चौथ्या), शिखर धवन (सातव्या) आणि महेंद्रसिंहधोनी (नवव्या स्थानी) यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा अॅबी डिव्हिलियर्स अव्वल स्थानावर आहे.वनडे गोलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा एकही गोलंदाज टॉप टेनमध्ये नाही; परंतु यातील काहींनी मात्र प्रगती केली आहे. मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चार क्रमांकांनी झेप घेतली असून, तो १२ व्या स्थानी पोहोचला आहे. अक्षर पटेलने १८ स्थानांनी झेप घेतली असून तो ४७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. मोहित शर्मानेदेखील सात क्रमांकांनी झेप घेतली आहे. तो ५१ व्या स्थानी आहे. हरभजनसिंग १0१ व्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)
झिम्बाब्वेवरील सफायानंतर भारत वनडेत दुसऱ्या स्थानी कायम
By admin | Published: July 17, 2015 3:34 AM