आॅनलाइन लोकमत -सनरायजर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नर आणि विजय शंकर यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर गुजरात लायन्सवर विजय मिळवला. वॉर्नरने फलंदाजीचे कसब पुन्हा एकदा दाखवत विजय शंकरच्या साथी संघाला विजय मिळवून दिला. सोबतच सनरायजर्सचा प्ले आॅफमधील प्रवेश नक्की केला. हैदराबादने आता गुणतक्त्यात दुसरे स्थान गाठले आहे. दमदार सलामीनंतर गुजरातला आपला डाव सांभाळता आला नाही.
स्मिथ आणि किशनच्या अर्धशतकांनंतर एकही फलंदाज खेळपट्टीवर न स्थिरावल्याने गुजरातचाडाव १५४ धावातच संपुष्टात आला. स्मिथ आणि किशन यांनी हैदराबादची गोलंदाजी फोडून काढताना १०.१ षटकांत १११ धावांची खेळी केली. अफगाणचा युवा फिरकीपटू राशीद खान याने स्मिथला बाद करत ही जोडी फोडली त्यानंतर मोहम्मद सीराज याने चार गडी बाद करत गुजरातचे कंबरडेच मोडले. राशीद खान, भुवनेश्वर कुमार आणि सीराज या तिघांच्या भेदक माऱ्यासमोर गुजरातचे इतर फलंदाज टिकू शकले नाही. हैदराबादची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. धवन १८ धावांवर बाद झाला. त्यानंतर हेन्रीक्सही तंबूत परतला. मात्र, वॉर्नर आणि शंकरची खरी खेळी त्यानंतर सुरू झाली. गुजरातच्या प्रवीण कुमार वगळता कोणत्याही गोलंदाजाला लय सापडली नाही. या विजयामुळे हैदराबादने १७ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे.