लंडन : कारकिर्दीत प्रथमच आयसीसी स्पर्धेत खेळण्यासाठी केदार जाधव उत्सुक असणे स्वाभाविक आहे, पण इंग्लंडमधील परिस्थितीमध्ये पूर्णपणे आक्रमक पवित्रा स्वीकारणे उपयुक्त ठरणार नाही, याची त्याला कल्पना आहे. जाधवला रविवारी न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या पहिल्या सराव सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण तरी या लढतीच्यानिमित्ताने त्याला बरेच काही शिकता आले. मंगळवारी बांगलादेशविरुद्ध भारताच्या दुसऱ्या सराव सामन्यापूर्वी बोलताना जाधव म्हणाला, ‘‘रविवारच्या लढतीत प्रत्येक धाव घेण्यासाठी फलंदाजांना मेहनत घ्यावी लागत असल्याचे दिसून आले. परिस्थितीमध्ये सातत्याने बदल होत असल्यामुळे फलंदाजांना ताळमेळ साधण्यास अडचण भासत होती.’’ बदलणाऱ्या वातावरणामध्ये भारतीय फलंदाजांनी खेळपट्टीवर वेळ घालवित संघाला सहज विजय मिळवून दिला. जाधव म्हणाला, ‘‘खेळपट्टीवर हिरवळ होती आणि वातावरण बदलत असल्यामुळे चेंडू स्विंग होत होता. परिस्थिती अशीच असेल तर आगामी सामन्यांमध्ये आक्रमक पवित्रा स्वीकारता येईल, पण तंत्राचा विचार करता कसोटी सामना किंवा रणजी ट्रॉफी सामन्याप्रमाणे फलंदाजी करावी लागेल.’’ (वृत्तसंस्था)
आक्रमक खेळणे उपयुक्त ठरणार नाही : जाधव
By admin | Published: May 30, 2017 1:05 AM