रोहित नाईक, मुंबईसध्याच्या भारतीय संघातील युवा खेळाडूंमध्ये असलेली आक्रमकता निश्चित चांगली आहे. मात्र केवळ आक्रमकतेने क्रिकेट खेळता येत नाही, तर तेवढीच क्षमताही असावी लागते, असे मत व्यक्त केले आहे ते भारतीय क्रिकेटपटूंमध्ये आक्रमकता रोवणारा माजी भारतीय कर्णधार ‘दादा’ सौरभ गांगुली याने. मुंबईत मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमात गांगुलीने ‘लोकमत’सह बातचीत केली.भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची आक्रमकता मला आवडते. त्याचे मैदानावरील नेतृत्वकौशल्य लक्षवेधी आहे. संघातील प्रत्येक खेळाडूची देहबोली सकारात्मक असून सर्वांमध्ये जिंकण्याची जिद्द आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्धसुद्धा युवा खेळाडूंचा हाच जोश दिसून येईल अशी अशा आहे, असेही गांगुली म्हणाला.द. आफ्रिकेच्या पूर्वीच्या आणि आताच्या संघातील फरकाविषयी गांगुलीने सांगितले, की मी खेळत असतानाचा आफ्रिका संघ आणि आताचा आफ्रिका संघ हे कायमच बलाढ्य राहिले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून नेहमीच उत्कृष्ट क्रिकेटपटू मिळाले आहेत. फरक एकच आहे, की त्यावेळच्या तुलनेत आताच्या आफ्रिकी खेळाडूंना भारतीय वातावरणात खेळण्याचा अनुभव अधिक आहे. आयपीएलच्या माध्यमातून आताचे आफ्रिकी खेळाडू सातत्याने भारतीय भूमीवर खेळत असल्याने याचा त्यांना निश्चितच फायदा होईल. हा अनुभवच त्यांच्यासाठी निर्णायक ठरेल.-------दिवंगत जगमोहन दालमिया यांच्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष कोण? या प्रश्नावर गांगुलीने ‘येणारी वेळच अध्यक्ष ठरवेल,’ असे सांगितले. बीसीसीआयअंतर्गत अनेक संघटना आहेत. सध्या मीडियातूनच अध्यक्षपदाच्या शर्यतीतील नावांची माहिती मिळत आहे. सर्वाधिक कल मिळवणाराच अध्यक्ष बनेल. मी याआधी बीसीसीआयच्या कोणत्याही कार्यात सहभागी नव्हतो. तेव्हा दालमिया सर्व कारभार सांभाळत होते. माझ्यासाठीही हे सर्व नवीन असल्याने तूर्तास तरी येणारी वेळच सर्व काही ठरवेल, असे गांगुलीने सांगितले.-------‘कॅब’चा अध्यक्ष म्हणून नवीन आव्हाने आहेत. आव्हानांना सामोरे जाणे मला नेहमीच आवडते. मी अजूनही पूर्णपणे अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली नाहीत. संघटनेच्या नियमांप्रमाणे ती जबाबदारी सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. प्रशासक म्हणून बंगालमधील क्रिकेटमध्ये आणखी प्रगती करण्याचा माझा प्रयत्न असेल. ११ महिन्यांच्या सचिवपदाचा अनुभव आहे. त्यामुळे प्रशासक म्हणून ही माझी नवीन सुरुवात असून यामध्येही नक्की यशस्वी होईल.- सौरभ गांगुली
आक्रमकता चांगली; मात्र तेवढीच क्षमताही हवी
By admin | Published: September 29, 2015 11:26 PM