नवी दिल्ली : आठ वर्षांआधी सुरू करण्यात आलेली आयलीग फुटबॉल स्पर्धा अपयशी ठरल्याचे निरीक्षण अ. भा. फुटबॉल महासंघाचे सल्लागार, माजी दिग्गज खेळाडू बाइचुंग भूतिया याने नोंदविले आहे. यशस्वी ठरलेल्या इंडियन सुपरलीगमध्ये (आयएसएल) आयलीगचे विलिनीकरण करण्याआधी आयएसएलला आणखी काही वर्षे स्वतंत्रपणे सुरू ठेवावे अशीही भूतियाने सूचना केली. सन २०११मध्ये निवृत्त झालेला भूतियाने अनेक वर्षे भारताचे फुटबॉल क्षेत्र गाजवले आहे. शंभरावर आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव त्याच्याकडे आहे. आयलीग आणि आयएसएलच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भूतिया म्हणाला, ‘‘सध्यातरी या दोन्ही लीगच्या विलिनीकरणाची शक्यता मला दिसत नाही.’’आयलीगने प्रेक्षक खेचले नाहीत, शिवाय मीडियातही लोकप्रियता संपादन केली नाही, उलट दोन सत्रांत आयएसएलने लोकप्रियता मिळविली. प्रामाणिकपणे सांगायचे तर आयलीग यशस्वी ठरलीच नाही. मीडियाने सामन्यांकडे पाठ फिरविली आणि प्रेक्षकही सामना पाहायला येत नव्हते. आयलीग यशस्वी झाली असती तर आयएसएलची गरजही भासली नसती. आयएसएल पहिल्या सत्रापासूनच फुटबॉल चाहत्यांना हवीहवीशी वाटत आहे. - बाइचुंग भूतिया, फुटबॉल महासंघाचे सल्लागार
आयलीग फुटबॉल अपयशी
By admin | Published: December 20, 2015 2:49 AM