- अँडेर हेरेरा याच्याशी केलेली बातचित...मँचेस्टर युनायटेडचा अँडेर हेरेरा याने चेल्साविरुद्धच्या २-० विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. चेल्साचा एडन हॅजार्ड आता स्पर्धेतून बाहेर झाला आहे; त्यामुळे टॉप फोरमध्ये स्थान मिळविण्याचे हेरेरा आणि त्याच्या संघाचे लक्ष्य आहे. यातून तो चॅम्पियन्स लीगसाठी पुढच्या वर्षी संघाचा दावा बळकट करण्याच्या प्रयत्नात आहे. इंग्लिश प्रिमीयर लीगचा आघाडीचा फुटबॉल संघ असलेल्या चेल्साला पराभूत केल्याने मँचेस्टर युनायटेडचा आत्मविश्वास वाढला आहे. आता रविवारी बर्नलेविरुद्धचा सामना जिंकून आठवड्याअखेर पाचव्या स्थानावर संघ पोहोचणे हे मँचेस्टरच्या खेळाडूंचे उद्दिष्ट असेल. स्पॅनिश अँडेर हेरेराच्या मते त्याच्या संघाला आता चांगली संधी आलेली आहे. त्याच्याशी केलेली ही बातचित...युनायटेड मँचेस्टरसाठी हे सत्र तसे चांगले सुरू आहे, आॅक्टोबर महिन्यापासून तुमचा संघ अजिंक्य राहिला आहे; पण त्यात खूपच सामने बरोबरीत सुटले आहेत, असे वाटते का?आमचे अनेक सामने अनिर्णीत राहिले हे खरे आहे; पण आम्ही चांगला खेळ केला असे वाटते. आमच्या संघाने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व मिळवले आहे. आमचे व्यवस्थापक जोस मुऱ्हिनो यांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल चांगली सुरू आहे, हे तुम्ही पाहतच आहात. आमचा खेळ चांगला झाला असला, तरी त्याला विजयाचे रूप देण्यात नशिबाची साथ कमी पडली, असे म्हणावे लागेल.गेल्या रविवारी चेल्सावर मिळविलेला विजय हा तुला या स्पर्धेतील मोठा विजय वाटतो का?निश्चितच! तो आमच्यासाठी महत्त्वाचा सामना होता. या विजयाने आम्ही टॉप फोरमध्ये स्थान मिळवून पुढील वर्षी चॅम्पियन्स लीगमध्ये खेळू शकतो, अशी आशा निर्माण झाली आहे. आता विजयाची हीच लय कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे.या विजयाला तू किती महत्त्व देशील आणि संघाच्या अलीकडील प्रगतीविषयी काय सांगशील?चेल्सा संघ किती ताकदवान आहे, हे सर्वांना माहीत आहे. प्रिमीयर लीगमध्ये ते सध्या टॉपर आहेत. विजेतेपदाचे ते प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्याविरुद्ध जिंकण्यासाठी आम्हाला उच्च प्रतीचा खेळ करावा लागणार, हे माहीत होते. या कटिबद्धतेमुळेच आम्ही जिंकलो. आता गरज आहे, ती असाच खेळ पुढे सुरू ठेवण्याची. असाच खेळ संघाकडून अपेक्षित होता का?या सत्रात आम्ही होम ग्राउंडवर अनेक महत्त्वपूर्ण गुण गमावले आहेत. गुणतालिकेत त्यामुळे आम्ही मागे राहिलो. अनिर्णीत राहिलेल्या सामन्यांपैकी अनेक सामने आम्ही जिंकू शकलो असतो. तसे झाले असते, तर आम्ही गुणतालिकेत वरच्या काही क्रमांकावर आलो असतो. चेल्साविरुद्धच्या सामन्यात आमचा खेळ अगदी नियोजनबद्ध झाला. आमचे पासेस चांगले होते. खेळावर आम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत नियंत्रण ठेवले होते.चेल्साविरुद्धच्या सामन्यात तू गोल नोंदविलास त्याबद्दल तुला काय वाटते?मी प्रयत्न पुष्कळ करीत होतो; परंतु त्यांच्या गोलरक्षकाने चांगली कामगिरी केल्याने मला यश येत नव्हते. पण, शेवटी गोल करण्यात यश आल्याने मी खूप आनंदी आहे.बर्नलेविरुद्ध काही विशेष रणनीती आखली आहे का? वेगळे आणि विशेष असे काही करण्याची गरज नाही. फक्त कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे. गेल्या आठवड्यात जसे खेळलो तसाच खेळ करण्याची गरज आहे. आता शेवटचे मोजकेच सामने उरले असल्याने टॉप फोरमध्ये येण्यासाठी आम्हाला पराकाष्ठा करावी लागेल, याचे फक्त स्मरण ठेवून खेळण्याची गरज आहे.संघाच्या नामावलीत सध्या तुझे नाव पहिल्या क्रमांकावर असते. ही गोष्ट तुझ्यासाठी भूषणावह आहे असे तुला वाटते का?मला त्याचे जास्त महत्त्व वाटत नाही. संघासाठी कठोर परिश्रम करणे इतकेच मला माहीत आहे. संघ व्यवस्थापकाने नेमून दिलेले काम चांगल्या पद्धतीने पार पाडणे, हेच मी माझे आद्य कर्तव्य समजतो. (पीएमजी)
मँचेस्टर युनायटेडला टॉप फोरमध्ये आणण्याचे लक्ष्य
By admin | Published: April 23, 2017 2:51 AM