मुंबई: बलाढ्य एअर इंडियाने उत्कृष्ट गोलंदाजीनंतर फलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर कसलेल्या एल अॅण्ड टी संघाला ४ विकेट्सने नमवून इन्शूरन्स टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली. शम्स मुलानीने शानदार अष्टपैलू खेळ करताना एअर इंडियाच्या विजयात निर्णायक कामगिरी केली. अन्य एका सामन्यात मुंबई महापालिका संघाने बाजी मारताना बँक आॅफ इंडियाचे कडवे आव्हान २९ धावांनी परतावून लावले.एल अॅण्ड टी संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १४१ धावा उभारल्या. एअर इंडियाच्या अचूक माऱ्यापुढे एल अॅण्ड टीच्या फलंदाजांना फटकेबाजीची जास्त संधी मिळाली नाही. फैझन अमिन याने एकाकी झुंज देताना सर्वाधिक ५२ धावा फटकावल्या. शम्स मुलानीने अवघ्या १४ धावांत ३ बळी घेत एल अॅड टीला रोखण्यात मोलाचे योगदान दिले. शिवाय महम्मद अझर (२/२५) आणि गोपेंद्र (२/२१) यांनी देखील चांगला मारा करताना मुलानीला चांगली साथ दिली.यानंतर एअर इंडियाने आक्रमक सुरुवात करुन आपला निर्धार स्पष्ट केला. मात्र फटकेबाजीच्या नादात एअर इंडीयाचे झटपट बळी गेले. यावेळी मुलानीने फलंदाजीतसुध्दा चमक दाखवत नाबाद ४४ धावांचा तडाखा देत संघाला विजयी भरारी मारुन दिली. विराज झगडे (४५) आणि निकेतन आडविलकर (२६) यांनी मोक्याच्यावेळी फटकेबाजी करताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. अभिमन्यू सिंगने (२/२६) चांगला मारा करताना एअर इंडियाला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. (क्रीडा प्रतिनिधी)महापालिकेचा विजयप्रथम फलंदाजी करताना मुंबई महापालिकेने निर्धारीत २० षटकंत ९ बाद १३३ अशी मजल मारली. संतोष धांडेने सामन्यात निर्णायक कामगिरी करताना प्रथम फलंदाजीत नाबाद ३९ फटकावून संघाला समाधानकारक मजल मारुन दिली. त्यानंतर २० धावांत ३ बळी घेत बँक आॅफ महाराष्ट्राला ९ बाद १०४ असे रोखले.
एअर इंडिया संघाची विजयी आगेकूच
By admin | Published: April 12, 2015 2:15 AM