कोरिया ओपन : कोरियाच्या खेळाडूवर मात
सोल : भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयराम याने कोरिया ओपन सुपर सिरीजमध्ये आपला शानदार फॉर्म कायम ठेवताना जगातील सातव्या क्रमांकावरील खेळाडू चिनी-तैपेईच्या चोऊ तियेन चेन याचा सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली.जयरामने सातव्या मानांकित चेनचा ४३ मिनिटे रंगलेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत २१-१९, २१-१५ असा पराभव केला. त्याचबरोबर जयरामने याच सत्रात जर्मन ओपन आणि अमेरिकी ओपन स्पर्धेत या खेळाडूविरुद्ध झालेल्या पराभवाची परतफेडही केली.३२व्या क्रमांकावरील खेळाडू जयरामची विजेतेपदाची लढत ही चीनचा चेन लोंग याच्याशी होईल. चेन लोंग हा जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू आहे.जयरामने २०११ आणि २०१३मध्ये थायलंड आणि जपानमध्ये तियेनचा चेनचा पराभव केला होता. त्याने सुरुवातीलाच ११-८ अशी आघाडी घेतली. तैवानच्या खेळाडूने ७ गुण घेऊन मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला; परंतु जयरामने पुन्हा मुसंडी मारून हा गेम जिंकला.दुसऱ्या गेममध्ये तो अधिक आत्मविश्वासाने खेळला आणि लवकरच त्याने ११-७ अशी आघाडी घेतली. तथापि, चेनने १२-१२ अशी बरोबरी साधली. त्यानंतर जयरामने प्रतिस्पर्ध्याला डोके वर काढण्याची उसंतच मिळू दिली नाही.जयरामने या हंगामात मलेशिया मास्टर्स ग्रांप्री गोल्ड, स्वीस ओपन ग्रांप्री गोल्ड, रशियन ओपन ग्रांप्री स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेली आहे. भारतीय खेळाडूंत श्रीकांत आणि सायना नेहवाल यांनी या वर्षी इंडिया सुपर सिरीजमध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. (वृत्तसंस्था)