अहमदाबाद : अजिंक्य रहाणे (७४) आणि शेन वॉटसन (४५) यांनी दिलेल्या ९५ धावांच्या सलामीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाबला १९२ धावांचे टार्गेट दिले. राजस्थानने आपल्या डावात ६ बाद १९१ धावा केल्या.सरदार पटेल स्टेडियमच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवागने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा आघाडी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि कर्णधार शेन वॉटसन यांनी किंग्जच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी ४२ चेंडूत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. दोघांची भागीदारी शतकाकडे चालली असताना अक्षर पटेलने ही जोडी फोडली. वॉटसन पुढे सरसावून फटका मारण्याच्या नादात यष्टीचित झाला. त्याने ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकार ठोकून ४५ धावा केल्या.सध्या आॅरेंज कॅप डोक्यावर मिरवणाऱ्या अजिंक्यने आजही शानदार फलंदाजी केली. त्याने ५४ चेंडूंत सहा चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ७४ धाावा केल्या. जॉन्सनच्या फसव्या स्लोअरवनवर यष्टीरक्षक वृध्दीमान सहाकडे झेल देवून रहाणे बाद झाला. दिपक हुडाने ९ चेंडूत झटपट १९ धावा केल्या. स्टीव्हन स्मिथला अक्षरने शुन्यावर मॅक्सवेलकरवी झेलबाद केले. रहाणे बाद झाल्यावर मात्र राजस्थानच्या धावांचा ओघ आटला. त्यांचा डाव ६ बाद १९१ वर येवून थांबला.(वृत्तसंस्था)
अजिंक्य-वॉटसनची भक्कम पायाभरणी
By admin | Published: April 22, 2015 3:10 AM