ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - इंग्लंडचा क्रिकेटर अॅलेस्टर कूकने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडण्याचा नवा विक्रम केला. कूक हा कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा सर्वाधिक यंग खेळाडू ठरला आहे. त्याने सचिनचा रेकॉर्ड पाच महिन्यांनी मोडला आहे. २००५ मध्ये सचिनचे वय ३१ वर्ष, दहा महिने, २० दिवस असताना सचिनने कसोटीमध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठला होता. तर कूकने हा रेकॉर्ड त्याचे वय ३१ वर्ष, पाच महिने असताना केला.
कूक हा इंग्लंडचा सर्वाधिक जास्त धावा काढणारा फलंदाज आहे. इंग्लंडकडून कसोटीमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणारा कूक हा पहिलाच फलंदाज आहे. त्यानंतर इंग्लंडचा फलंदाज ग्राहम गूचने ११८ कसोटी सामन्यांत ८९०० धावा केल्या आहेत. कुकने क्रिकेटमधील करिअरला मार्च २००६ मध्ये सुरुवात केली. त्याने भारताविरुद्धच्या नागपूरमधील पहिल्याच कसोटी सामन्यात चांगली खेळी केली होती.
कसोटीमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणारा कूक हा १२ वा खेळाडू आहे. त्याआधी सचिन तेंडुलकर, रिकी पॉंटिंग, जॅक कॅलिस, राहुल द्रविड, कुमार संगकारा, ब्रॉयन लारा, शिवनरेन चांदरपॉल, महेला जयवर्धने, अलेन बॉर्डर, स्टीव्ह वॉ आणि सुनील गावस्कर यांनी दहा हजारांचा टप्पा पूर्ण केला आहे.