बर्मिंगहॅम : आॅलिम्पिक पदकप्राप्त सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू उद्यापासून सुरू होणाऱ्या सुपर सिरीज प्रिमीअर स्पर्धेत भारतीय आव्हानाचे नेतृत्व करतील. या दोन्ही खेळाडूंचा प्रतिष्ठित आॅल इंग्लंड ट्रॉफी मिळविणारी तिसरी भारतीय खेळाडू बनण्याचा प्रयत्न असेल.याआधी प्रकाश पदुकोण यांच्या १९८०च्या कामगिरीची पुनरावृत्ती पुलेला गोपीचंद यांनी २००१ मध्ये केली होती. त्यानंतर एकाही भारतीय खेळाडूला ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकता आलेली नाही. सायना ही एकमेव भारतीय खेळाडू आहे, की जी ही कामगिरी करण्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली होती. तिने २०१५च्या फायनलमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती; परंतु तिला आॅलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मारिन हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. सायना आता गुडघ्यावरील शस्त्रक्रियेतून पूर्णपणे सावरली असून, तिचे लक्ष्य हे आता जागतिक बॅडमिंटनमध्ये आपले स्थान पुन्हा मिळविणे आहे. सायना आणि सिंधू या दोघींनी नव्या सत्राची सुरुवात मलेशिया मास्टर्स आणि सय्यद मोदी ग्रांप्री गोल्ड स्पर्धेतील विजेतेपदाने केली. आठव्या मानांकित सायनाचा सामना गत चॅम्पियन जपानच्या नोजोमी आकुहारा हिच्याशी होईल.
आॅल इंग्लंड; सायना, सिंधू करणार भारतीय आव्हानाचे नेतृत्व
By admin | Published: March 07, 2017 12:48 AM