ब्राझिलिया : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून तो यंदा अर्जेंटिनाला कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या रूपाने पहिले मोठे जेतेपद मिळवून देऊ शकतो, असा विश्वास फुटबॉलप्रेमींना वाटत आहे. त्यातच उपांत्य फेरीत अर्जेंटिनाचा सामना कोलंबियाविरुद्ध होणार असून या सामन्यात सर्वांची नजरे मेस्सीवरच टिकून राहतील, यात शंका नाही.अंतिम फेरी गाठण्यासाठी अर्जेंटिनाला आणि खास करुन मेस्सीला कोलंबियाचा गोलरक्षक डेव्हिड ओस्पिना याचे भक्कम बचाव भेदावे लागेल. या सामन्यातील विजेता संघ शनिवारी यजमान ब्राझीलविरुद्ध जेतेपदासाठी भिडेल. मेस्सी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने स्पर्धेत चार गोल केले आहेत, तसेच चार गोल करण्यात मोलाची भूमिकाही निभावली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात त्याने इक्वेडोरविरुद्ध एक गोल करताना दोन करण्यात सहायता केली होती. दुसरीकडे, उरुग्वेचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करत कोलंबियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अर्जेंटिनाने १९९३ सालच्या कोपा अमेरिका जेतेपदानंतर अद्याप एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही. कोलंबियाने २००१ साली ही स्पर्धा जिंकली होती.
मेस्सीवर असेल सर्वांची नजर, अर्जेंटिना-कोलंबिया उपांत्य सामन्याची उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 9:15 AM