धरमशाला : वेगवान गोलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या अष्टपैलूचा शोध अद्याप संपलेला नसून, त्यामुळे संघाचे योग्य संयोजन करण्यासाठी मदत मिळेल, अशी प्रतिक्रिया मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला गोलंदाजी संयोजनाबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘‘आमच्याकडे चार फिरकीपटू (रविचंद्रन आश्विन, हरभजन सिंग, अमित मिश्रा व अक्षर पटेल) आणि तीन वेगवान गोलंदाज (मोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार व श्रीनाथ अरविंद) आहेत. एक सीमर अष्टपैलू (स्टुअर्ट बिन्नी) संघात आहे. परिस्थितीनुसार खेळाडूंची निवड करण्यासाठी पर्याय आवश्यक आहे. याव्यतिरिक्त संघ दमदार कसा होईल, याकडेही लक्ष द्यावे लागते. दोन फिरकीपटूंना संधी दिली तर त्यातील एक चांगला फलंदाज असायला हवा. चांगली फलंदाजी करण्याची क्षमता असलेला आणि टी-२० मध्ये चार षटके व ५० षटकांच्या सामन्यात १० षटके वेगवान मारा करणारा अष्टपैलू खेळाडू संघात नाही. त्यामुळे याचा विचार करूनच संघाची निवड करावी लागते.’’कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करणार, याबाबत धोनीने स्पष्ट केलेले नाही. आमच्याकडे अनेक खेळाडू आघाडीच्या फळीतील फलंदाज आहेत. पण आयपीएल किंवा टी-२० सामन्यांत ते वेगवेगळ्या स्थानांवर खेळत असतात. रोहित डावाची सुरुवात करतो तर अजिंक्य रहाणे मधल्या फळीत खेळतो. अनेक खेळाडू आघाडीच्या फळीत खेळण्यास उत्सुक असतात. पण मधल्या व तळाच्या फळीतही कुणाला न कुणाला खेळावे लागेल, असेही धोनीने सांगितले. सुरेश रैना फिनिशरची भूमिका बजावण्यास तयार आहे का, याबाबत धोनीने नकारात्मक उत्तर दिले. धोनी म्हणाला, ‘‘रैना फिनिशर नाही. त्याने अनेक लढतींत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केलेली आहे.’’ या मालिकेमुळे आगमी टी-२० विश्वकप चॅम्पियनशिपच्या तयारीवर विशेष प्रभाव पडणार नाही, असेही धोनीने या वेळी सांगितले. मी अद्याप खेळपट्टी बघितलेली नाही; पण नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. दव जर अधिक पडले, तर नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. ७ वाजता सुरू होणाऱ्या लढतीत ७.१५ पासून दव पडायला सुरुवात झाली, तर उभय संघांसाठी परिस्थिती समान राहील. (वृत्तसंस्था)
अष्टपैलू वेगवान गोलंदाजाचा शोध सुरूच
By admin | Published: October 01, 2015 10:46 PM