नवी दिल्ली - जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून देणा-या हिमा दासचे प्रशिक्षक निपुण दास यांनी लैंगिक शोषणाचा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुवाहाटी येथे प्रशिक्षण देणा-या निपुण दासवर अन्य खेळाडूने हा गंभीर आरोप केला आहे. मात्र निपुण दास यांनी हे आरोप फेटाळून लावलेत.
दास यांच्यावर आरोप करणा-या खेळाडूने आंतरशालेय राष्ट्रीय स्पर्धेत आसामचे प्रतिनिधीत्व केले आहे. गुवाहाटी येथील स्टेडियममध्ये लैंगिक शोषण झाल्याचा दावा त्या खेळाडूने केला आहे. तसेच याबाबत कुणालाही सांगितल्यास सराव सत्रातून व महत्त्वाच्या स्पर्धेतून वगळण्याची धमकी दास देत असल्याचा दावाही तिने केला. पीडित मुलीच्या घरच्यांनी 22 जूनला बसिष्ठा पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे. एफआयआरमध्ये कलम 342, 354, 376, 511 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दास यांना एका दिवसाच्या कारागृहानंतर जामीन मिळाला होता.
दास यांनी हे आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले, ' माझ्यावर करण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप चुकीचे आहेत. ज्या मुलीकडून हे आरोप करण्यात आलेले आहेत, ती माझ्याकडे प्रशिक्षणाला अजूनही येत आहे. जर मी दोषी आढळलो, तर मला नक्की शिक्षा द्या. मात्र मी निर्दोष ठरलो, तर त्या मुलीला शिक्षा व्हायला हवी.'