मोहाली : मार्कस् स्टोइनिसच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने इंडियन प्रिमीयर लीग सामन्यात शनिवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ९ धावांनी पराभव केला.पंजाबने स्टोइनिस (५२) आणि वृद्धिमान साहा (५२) यांचे अर्धशतक आणि या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी केलेल्या ५८ धावांच्या भागीदारीच्या बळावर ५ बाद १८१ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात सलामीवीर क्विंटन डिकॉक (५२) आणि संजू सॅमसन (४९) यांनी सलामीसाठी केलेल्या ७0 धावांच्या आक्रमक भागीदारीनंतरही दिल्लीला ५ बाद १७२ या धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. पंजाबकडून स्टोइनिसने गोलंदाजीतही कमाल करताना ४0 धावांत ३ गडी बाद केले. मोहित शर्माने किफायती गोलंदाजी करताना ४ षटकांत फक्त २१ धावा दिल्या. पंजाबचा ९ सामन्यांतील हा तिसरा विजय असून त्यांचे ६ गुण झाले आहेत; परंतु संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावरच आहे. विजयाचा पाठलाग करताना डिकॉक आणि सॅमसन या जोडीने सावध सुरुवात केली. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये ५१ धावा कुटल्या. डिकॉक प्रारंभापासूनच लयीत दिसत होता. सॅमसनने मोहितला चौकार मारून खाते उघडले, तर डिकॉकने लेगस्पिनर केसी करिअप्पा आणि संदीप शर्माचा समाचार घेतला. डिकॉकने स्टोइनिसचे स्वागत सलग दोन चौकारांनी केले व नंतर फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला सलग चेंडूवर षटकार व चौकार मारला. त्याने स्टोइनिसला षटकार ठोकत २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले; परंतु याच षटकात तो पॉइंटवर अक्षरकरवी झेलबाद झाला. त्याने ३0 चेंडूंच्या खेळीत ६ चौकार व २ षटकार मारले. त्यानंतर सॅमसन आणि करुण नायर यांनी दुसऱ्या गड्यासाठी ५१ धावांची भागीदारी केली. या दोघांनी दिल्लीचे धावांचे शतक १२ व्या षटकात झळकावले. स्टोइनिसने सॅमसनला बाद करीत ही जोडी फोडली. दिल्लीला अखेरच्या २ षटकांत २८ धावांची गरज होती; परंतु मोहित शर्माने १९ व्या षटकात फक्त ३ धावा देत किंग्ज इलेव्हन पंजाबचा विजय सुकर केला. त्याआधी साहा आणि मार्कस स्टोइनिस यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध ५ बाद १८१ धावा केल्या.(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ५ बाद १८१. (वृद्धिमान साहा ५२, मार्कस स्टोईनिस ५२. ख्रिस मॉरिस २/३०, झहीर खान १/२५, मोहमद शमी १/३४).दिल्ली डेअरडेव्हिल्स : २0 षटकांत ५ बाद १७२ (क्विंटन डी कॉक ५२, संजू सॅमसन ४९, करुण नायर २३. मार्कस स्टोईन्स ३/४0, करिअप्पा १/३७)
स्टोइनिसच्या अष्टपैलू खेळीने किंग्ज इलेव्हन पंजाब विजयी
By admin | Published: May 08, 2016 3:18 AM