मुंबई : आगामी टी-२० विश्वचषक भारतात होत आहे. असे असले तरी होम पिचचा भारताला फायदा होणार नाही; कारण आयपीएल स्पर्धेमुळे आघाडीच्या खेळाडूंचा भारतीय पिचवर चांगला सराव झाला आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धा आव्हानात्मकच असेल, असे मत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केले. स्पर्धा आणि स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले. त्यानंतर आयोजित चर्चासत्रात विराट बोलत होता. संजय मांजरेकरच्या प्रश्नावर उत्तर देताना विराट म्हणाला की, गेल्या सात-आठ वर्षांपासून जगभरातील खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. त्यामुळे त्यांना येथील खेळपट्टीचा तसेच हवामानाचा अंदाज आहे. त्यामुळे भारतासाठी ही स्पर्धा इतकी सोपी राहणार नाही. घरच्या मैदानावर खेळणे आता आमच्यासाठी इतकेही फायद्याचे ठरणारे नाही. त्यामुळे कोणताही संघ हा प्रबळ दावेदार ठरू शकतो. गेल्या वर्षी मात्र आम्ही फायनलपर्यंत मजल मारली होती. फायनलमध्ये पराभूत झाल्याने खूप दु:ख झाले होते, असेही विराटने सांगितले. विश्वचषक स्पर्धा मार्च-एप्रिल दरम्यान होणार आहे. धोनीकडून शिकणार...धोनीकडून काय शिकणार? या मांजरेकरच्या प्रश्नावर विराट म्हणाला, प्रतिकूल परिस्थितीत धैर्य न गमावता संघर्ष कसा करावा, हे कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीकडून शिकणार आहे. धोनी हा अत्यंत संयम राखून असतो. त्याची ही कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करेन, असे विराटने धोनीची प्रशंसा करीत म्हटले. तो म्हणाला, गमावलेले सामनेही धोनीने जिंकून दिले आहेत.त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचला. त्यानंतर कसोटी नंबर वन आणि टी-२० तही नंबर वन राहिला. एका कर्णधारासाठी यापेक्षा मोठे यश असू शकत नाही. >>>> सर्वच संघांसमोर आव्हान : रहाणेमुंबई : आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा भारतात होत असली तरी भारतीय संघापुढे मोठे आव्हान असेल, अशा विराटच्या मतावर अंजिक्य रहाणेसुद्धा सहमत आहे. रहाणे म्हणाला की, घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघावर मोठा दबाव असेल. सर्व संघ जेतेपदासाठी मैदानात उतरतील. तुलनेत भारताची परीक्षा असेल. या खेळाच्या सर्व प्रकारात आनंद लुटण्याचा माझा प्रयत्न असतो. मात्र, टी-२० स्पर्धेत खेळणे विशेष ठरते. माझ्या खेळात खूप सुधारणा केल्या असून सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल. सर्वच संघांना स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांसमोर आव्हान असणार आहे. टी-२० मध्ये खेळण्याची एक वेगळीच मजा असते त्यामुळे सर्वच संघातील खेळाडू स्वत:चा उत्कृष्ट खेळ दाखविण्याचा प्रयत्न करतील. या स्पर्धेत जो संघ सर्वश्रेष्ठ खेळी करेल तोच संघ विजयी ठरेल. ही स्पर्धा भारतात असल्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या आमच्या संघाकडून अपेक्षा विजेतेपद जिंकण्याच्याच असणार आहेत. पण प्रत्येक सामन्यात खेळाडूंना सूर गवसेलच असे आताच सांगता येत नाही, असे अजिंक्य रहाणेने शेवटी सांगितले.
‘होम पिच’ असले, तरी आव्हानात्मकच!
By admin | Published: December 12, 2015 12:16 AM