Women's Junior Hockey Asia Cup । नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून अजिंक्यपद पटकावले. खरं तर क्रिकेटमध्ये भारताचा पराभव झाला असला तरी हॉकीमध्ये भारताच्या पोरींनी सोनेरी यश मिळवले. हॉकी महिला ज्युनिअर आशिया चषक स्पर्धेत भारताने इतिहास रचला असून प्रथमच जेतेपद पटकावले आहे.
दरम्यान, भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. भारताने प्रथमच हॉकी महिला ज्युनिअर आशिया चषकाच्या स्पर्धेवर नाव कोरले आहे. अंतिम फेरीत टीम इंडियासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान होते. भारताने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या दक्षिण कोरियाचा २-१ असा पराभव केला. दक्षिण कोरियाने सर्वाधिक ४ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा २०२१ मध्येच होणार होती पण कोरोनामुळे ती दोन वर्षांच्या विलंबाने खेळवली गेली.
भारताच्या पोरींनी रचला इतिहासभारताच्या महिला हॉकी ज्युनिअर संघाने दक्षिण कोरियाचा पराभव करून ही किमया साधली. जपानमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या विजयाचा मान भारतीय महिलांना मिळाला. विजयानंतर हॉकी इंडियाने घोषित केले की, खेळाडूंना प्रत्येकी २ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. तसेच सहाय्यक कर्मचार्यांना महिला ज्युनिअर आशिया चषक २०२३ चे विजेतेपद जिंकल्यामुळे प्रत्येकी १ लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळेल.