नवी दिल्ली : भारतीय नेमबाज अमनप्रीतसिंग याने आयएसएसएफ विश्वचषकात पदार्पणातच कांस्य पदक जिंकले. स्टार नेमबाज जितू राय याने चौथ्या दिवशी निराश केले. तो सातव्या स्थानावर घसरला. विश्वचषकाचा रौप्य विजेता असलेल्या अमनप्रीतने कर्णीसिंग शुटिंग रेंजमध्ये पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात २०२.२ गुण संपादन केले. राय मात्र १२३.२ गुणांचीच कमाई करू शकला. सात नेमबाजांमध्ये तो अखेरच्या स्थानावर राहिला. याआधी दोघांनीही सहजपणे पात्रता फेरीचा अडथळा पार केला होता.सर्बियाच्या दामिर किमेच याने २२९.३ गुणांसह सुवर्ण जिंकले. युक्रेनचा ओलेह ओमेलचक याला २२८.०० गुणांसह रौप्य मिळाले. अमनप्रीतने कांस्य पदाच्या शर्यतीत तुकईरचा युसुफ डिकेच आणि सर्बियाचा दिमित्री गिरगिच यांना मागे टाकले. यंदा सुरुवातीला याच प्रकारात विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात अमनप्रीतने रौप्य जिंकले होते. त्यावेळी जितू राय सुवर्ण विजेता होता.अमनप्रीत म्हणाला, ‘विश्वचषकाच्या निर्णायक फेरीत सर्वोत्कृष्ट नेमबाज सर्वस्व पणाला लावतात. माझी ही सर्वोत्कृष्ट कामगिरी समजू शकता. गुणांच्या दृष्टीने मात्र फार चांगली कामगिरी झाली नाही. यावर सुधारणा करेन.’>नेमबाज संग्राम दहिया याने शुक्रवारी आयएसएसएफ विश्व नेमबाजी स्पर्धेच्या पुरुष दुहेरी ट्रॅपचे रौप्य पदक जिंकले. त्याने ८० पैकी ७६ नेम साधले. सुवर्ण विजेता हू बिनयुहान याच्या तुलनेत संग्राम केवळ तीन गुणांनी माघारला.>इटलीचा गासपारानी दावी हा कांस्याचा मानकरी ठरला. सिनियर गटात संग्रामचे हे पहिलेच पदक आहे. त्याने २००९ मध्ये ज्युनियर आशियाई नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे.
अमनप्रीतला कांस्य, जितूकडून पुन्हा निराशा, संग्रामला ‘डबल ट्रॅप’चे रौप्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 4:13 AM