झुरिच : आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) वादग्रस्त अध्यक्ष सॅप ब्लाटर आणि महासचिव जेरोम वाल्के यांनी स्वत:वर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाविरुद्ध स्वत:ची बाजू मांडण्यासाठी अमेरिकेतील आघाडीच्या वकिलांना नेमले आहे.चोहीकडून टीकेचा भडिमार झाल्यानंतरही पाचव्यांदा फिफा अध्यक्षपदी निवडून आलेले ब्लाटर यांनी पद स्वीकारताच पदाचा राजीनामा दिला होता. फिफाच्या इतिहासात सर्वांत मोठ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामनाकरीत असलेले ब्लाटर हे स्विस आणि अमेरिकेतील तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. बँकेतील संशयास्पद व्यवहारप्रकरणी संशयाच्या जाळ्यात देखील ब्लाटर अडकण्याची शक्यता आहे. सूत्रानुसार ब्लाटर यांनी अमेरिकेचे माजी सरकारी वकील रिचर्ड कलेन यांना वकीलपत्र दिले. महासचिव जेरोम वाल्के यांनी प्रसिद्ध वकील बॅरी बेर्क यांना नेमले. स्विस आणि अमेरिकेतील तपास संस्था फिफातील भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या तपासात व्यस्त आहेत. आतापर्यंत ५३ संशयितांची ओळख पटविण्यात आली. स्वित्झर्लंडचे अटर्नी जनरल मायेकल लॉबर यांनी पत्रकारांशी बोलताना ब्लाटर आणि वाल्के यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या वृत्ताचा इन्कार केला नाही. (वृत्तसंस्था) फिफा स्कँडलमधील संशयित अर्जेंटियन व्यापाऱ्यांनी केले आत्मसमर्पणफिफा स्कँडलमधील संशयित अर्जेंटिनाच्या दोन व्यापाऱ्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या फिफा अधिकाऱ्यावर लाच स्वीकारल्याची शंका होती आणि अमेरिका या २ संशयितांच्या शोधात होती, अशा आशयाची माहिती आज न्यायमंत्रालयाने दिली. जगातील सर्वात मोठ्या खेळ समितीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या तपासात अमेरिकेला ज्या १४ फुटबॉल व विपणन अधिकाऱ्यांवर शंका आहे त्यात खेळ विपणन कंपनी फुल प्लेचे मालक पिता व पुत्र असणाऱ्या हुगो व मारियानो जिंकीस यांचा समावेश होता. हुगो व मारियानो या दोघांना आज ब्यूनस आयर्सच्या न्यायाधीशांसमोर उपस्थित झाले. यांच्याकडे साऊथ अमेरिका विश्वकप क्वॉलिफाइंग सामन्याचे टीव्ही हक्क आहेत व त्यांच्यावर अनेक लाख डॉलरच्या करारात फिफा अधिकाऱ्यांना लाच देण्याचा आरोप आहे.
अमेरिकेचे वकील ब्लाटर यांची बाजू मांडतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2015 2:17 AM