नवी दिल्ली : ‘यंदाचे वर्ष माझ्यासाठी आतापर्यंत आव्हानात्मक ठरले. अनेक स्पर्धांमध्ये मला झुंजावे लागले. त्यामुळेच अमेरिकन ओपन स्पर्धेतील पराभवाचा माझ्यावर भावनात्मक प्रभाव पडला,’ असे मत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केले. अमेरिकन ओपन स्पर्धेत सिंधूचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
टाचेच्या दुखापतीतून सावरत सिंधूने पाच महिन्यांनी बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन केले. मात्र, अद्याप ती आपल्या लौकिकानुसार खेळताना दिसली नाही. यंदाच्या सत्राचे अर्ध्याहून अधिक वर्ष संपल्यानंतरही सिंधूला अद्याप पहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा आहे. सिंधूने ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या की, ‘या पराभवाने माझ्यावर भावनात्मक प्रभाव पडला आहे. खास करून हे माझ्यासाठी यंदाचे वर्ष आव्हानात्मक ठरले असताना प्रत्येक यशस्वी स्पर्धेनंतर पराभवाचा अनुभव निराशाजनक ठरतो. मात्र, मी माझ्या या भावनांच्या जोरावर यंदाच्या सत्रातील उर्वरित स्पर्धांत शानदार कामगिरी करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.