मुंबई : माजी कसोटीपटू प्रवीण आमरे आणि कर्नाटकचे माजी आॅफ स्पिनर रघुराम भट्ट हे बीसीसीआयच्या नियमांतर्गत दुहेरी भूमिकेत (कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट) येत असल्याचा निर्वाळा बोर्डाचे लोकपाल माजी न्या. ए. पी. शाह यांनी दिला. त्याचवेळी शाह यांनी माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि आयपीएल संचालन परिषदेचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांना आरोपमुक्त केले. या सर्वांवर दुहेरी भूमिकेत असल्याचा आरोप करण्यात आला होता.मुंबई क्रिकेट संघटनेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कोचिंग स्टाफ आमरे यांच्याविरुद्ध लोकपालांकडे तक्रार करण्यात आली होती. चौकशीअंती ही तक्रार योग्य आढळून आली. आयपीएलच्या २०१५ च्या सत्राआधी मी डेअरडेव्हिल्सशी संलग्न होतो व नंतर एमसीएच्या व्यवस्थापन समितीचा सदस्य बनलो व नंतर डेअरडेव्हिल्सने माझा करार वाढविला, हा आमरे यांचा युक्तिवाद शाह यांनी चुकीचा ठरविला. बीसीसीआयच्या नियमानुसार ही दुहेरी भूमिका आहे. बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त युनिटच्या व्यवस्थापन समितीचा सदस्य असल्याने त्या व्यक्तीला आयपीएल फ्रॅन्चायसीचा लाभदायी होण्याचा अधिकार नसल्याचे शाह यांनी सांगितले. आमरे हे प्रशासक असल्याने त्यांनी कोचिंग स्टाफचे पद घेऊ नये. आमरे यांच्यावर योग्य करवाई करावी तसेच आयपीएलच्या पुढील सत्रात त्यांना कोचिंग स्टाफच्या भूमिकेत राहता येणार नसल्याचे, असे शाह यांनी आदेशात म्हटले आहे. वेंगसरकर हे सध्या मुंबई संघटनेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक आहेत. ही दोन्ही मानद पदे आहेत. पुण्यात ते ज्युनियर खेळाडूंसाठी अकादमी चालवितात असा त्यांच्यावर आरोप आहे. वेंगसरकर यांनी आपण माजी कर्णधार या नात्याने मानद पदावर असून प्रवास व निवास खर्च वगळता अन्य कुठलेही भत्ते घेत नसल्याचे उत्तरात स्पष्ट केले. गेल्या २१ वर्षांपासून आपण अकादमी चालवित असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात दुहेरी भूमिका जाणवत नसल्याचे लोकपालांनी म्हटले आहे.माजी रणजीपटू रघुराम भट्ट हे कर्नाटक क्रिकेट संघटनेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच १६ व १४ वर्षे गटाच्या निवड समितीचे चेअरमन आहेत. याशिवाय ते ब्रिजेश पटेल क्रिकेट अकादमी आणि आयडीबीआय अकादमीत सेवा देतात. भट्ट यांनी आपल्या उत्तरात दोन्ही अकादमीतून वेतन मिळत नसून केवळ टीए आणि डीए मिळतो, असे म्हटले आहे. लोकपालांनी भारतीय संघाचे कोच किंवा निवडकर्ते असताना त्या व्यक्तींनी खासगी कोचिंग अकादमींसोबत संबंध ठेवू नये, या नियमाकडे(२ सी) बोट दाखविले. भट्ट यांना दोन्ही अकादमींवरून तात्काळ हटविण्याचे आदेश शाह यांनी कर्नाटक क्रिकेट संघटनेला दिले. बी. के. रवी, एल. प्रशांत, अन्सूर अली खान, सोमशेखर सिरिगुप्पी, राजेश कामत, येरेगौडा हे मात्र दुहेरी भूमिकेत नसल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.(वृत्तसंस्था)
आमरे, भट्ट अडकले; वेंगसरकर, शुक्ला ‘बरी’
By admin | Published: July 15, 2016 2:22 AM