अभिजित देशमुख
ट्रॅप शूटिंग इव्हेंट कव्हर करत असताना चाहत्यांच्या गर्दीमध्ये अनोखे दृश्य माझ्या नजरेस पडले. अवघ्या ३ महिन्यांच्या बाळाला कडेवर घेत एक महिला ऑलिम्पिक सामन्याचा आनंद घेत होती, तसेच बाजूला उभा असलेला तिचा पती सामानासह दोघांच्या खाण्यापिण्याची काळजी घेत होता. कुतूहलापोटी मी या जोडप्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मोडक्यातोडक्या इंग्रजीत त्यांची प्रतिक्रिया ऐकल्यावर मला एका गोष्टीची अनुभूती झाली. ती म्हणजे, खेळावरील चाहत्यांच्या प्रेमाला कोणतीही मर्यादा नसते. या प्रेमापोटीच ते अनेक देशांच्या सीमा ओलांडून आपल्या आवडत्या खेळाडूला पाठिंबा देण्यासाठी येत असतात.
मूळचे स्पेनचे असलेले विक्टर आणि माराटा हे दोन वेळेचा विश्वविजेता आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक मानकरी अलबर्टो फर्नांडिस याला पाठिंबा देण्यासाठी इतका खटाटोप करून आले होते. खेळ आणि खेळाडूप्रति असलेल्या प्रेमापोटी त्यांनी ३ महिन्यांच्या बाळासह पॅरिस गाठले. कोरोनाकाळातल्या काही मर्यादांमुळे हे जोडपे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकले नव्हते; पण त्याची कसर त्यांनी पॅरिसमध्ये भरून काढली. एखाद्या कौटुंबिक सोहळ्याला उपस्थिती लावावी, तशी या दोघांनी अलबर्टोला पाठिंबा देण्यासाठी येथे हजेरी लावली होती. आमच्या बाळासाठी तो गॉडफादर असल्याची प्रतिक्रिया या गोघांची होती.
विक्टर नेमबाजीसाठी असलेल्या रेंजची देखभाल करण्याचे काम करतो. इथूनच त्याच्यामध्ये नेमबाजीविषयीचे प्रेम उत्पन्न झाले. मोठ्या अभिमानाने त्याने मला चॅम्पियन खेळाडू अलबर्टोसोबतचा त्याच्या मोठ्या मुलीचा फोटो दाखवला. ती का आली नाही, असे विचारल्यावर तो म्हणाला, ती सुद्धा इथे येण्यासाठी आमच्याइतकीच उत्साही होती; पण काही कारणास्तव येऊ शकली नाही. त्याच्या बोलण्यातून हे जाणवले की कदाचित भविष्यात त्याची ही मुलगी स्पेनसाठी सुवर्णपदक जिंकेल. स्पर्धेदरम्यान अनुभवलेले असे किस्से तुम्हाला प्रेरणा देऊन जातात, तसेच खेळाप्रती त्यांच्यात असलेला उत्साह आणि या उत्साहापोटी अनेक अडचणींवर मात करण्याची त्यांची असलेली तयारी माणसाला जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची उमेद देते.