पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत उतरलेल्या प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यातील संघर्षाची स्टोरी प्रेरणादायी आहे. त्यातही भारताची १७ वर्षांची पॅरा तिरंदाज शीतल देवीनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. दोन्ही हात नसलेली ही भारताची लेक पायांनी अचूक वेध साधण्यात पारंगत आहे. राकेश कुमार यांच्या साथीनं तिने मिश्र सांघिक कंपाउंड तिरंदाजीत भारताला कांस्य पदकाची कमाईही करून दिली.
भारताची युवा पॅरालिम्पिक चॅम्पियन ठरलीये शीतल
या पदकासह भारताकडून सर्वात कमी वयात पदक जिंकण्याचा विक्रमही तिच्या नावे झाला. फोकोमेलिया या दुर्मिळ आजाराशी लढणारी शीतल ही एकमेव महिला तिरंदाज आहे जी दोन्ही हात नसतानाही या खेळात आपली छाप सोडताना दिसते. पॅरालिम्पिक स्पर्धेत तिने जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर कोणत्याही संकटावर मात करता येते, हे दाखवून दिले आहे.
आनंद महिंद्रा यांनी २०२३ मध्येच कार गिफ्ट करण्यासंदर्भात व्यक्त केली होती इच्छा
प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील देशाच्या या लेकीच्या जिद्दीला सलाम केला आहे. खेळाच्या मैदानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आनंद महिंद्रा नेहमीच आघाडीवर असतात. पॅरालिम्पिक स्पर्धा गाजवणाऱ्या शीतल देवीला देखील त्यांनी २०२३ मध्येच कस्टमाइज्ड कार ऑफर केली होती. पण त्यावेळी शीतलनं गिफ्टला नकार दिला होता. खुद्द आनंद महिंद्रा यांनीच यासंदर्भातील गोष्ट शेअर केली आहे.
२०२५ मध्ये शीतलला गिफ्ट मिळणार, पण वर्षभर वाट का पाहायची?
आनंद महिंद्रा यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) पॅरा तिरंदाज शीतल देवी संदर्भात एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, भारताच्या युवा पॅरा अॅथलिट्सला त्यांनी कस्टमाइज्ड कार देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावेळी १७ वर्षीय शीतल हिने कार गिफ्ट स्वरुपात स्विकारण्यास नकार दिला होता. वयाच्या १८ व्या वर्षी यासंदर्भात विचार करेन, असे ती म्हणाली होती. २०२५ मध्ये दिलेला शब्द पूर्ण करेन. या क्षणाची मी अगदी उत्सुकतेनं वाट पाहत आहे, असा उल्लेख आनंद महिंद्रांनी खास पोस्टमध्ये केला आहे.