टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत २६ वर्षीय मीराबाई चानू हिनं ( Mirabai Chanu) ४९ किलो वजनी गटात एकूण २०२ किलो ( ८७ +११५ किलो) वजन उचलून रौप्यपदक जिंकले. २०००च्या सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत कर्नाम मल्लेश्वरीनं कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. मीराबाई हिनं तिच्या यशात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार असलेल्या प्रत्येकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. तिच्या खडतर काळात मदत करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सचा मीराबाईनं सत्कार केला. हे ट्रक ड्रायव्हर चानूला तिच्या नोंगपोक काकचिंग गावामधील घरापासून खुमान लम्पक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील प्रशिक्षण केंद्रापर्यंत रोज मोफत नेत असत. तिच्या या कृतीनं महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांना स्तब्ध केलं. मीराबाईच्या या कृतीचं कौतुक करणारे ट्विट करून आनंद महिंद्रा यांनी भावना व्यक्त केल्या. ( Anand Mahindra impressed Mirabai Chanu's That gesture)
आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या कुटुंबात मीराबाई चानूचा जन्म झाला अन् तिच्या प्रशिक्षणावर होणारा रोजचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. प्रशिक्षण केंद्र चानूच्या घरापासून ३० किलो मीटर दूर होते. तिथे जाण्यासाठी तिला १०-२० रुपये दिले जात होते, परंतु ते पुरेसे नसत. असा परिस्थितीत ती तिच्या घराजवळून जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सकडे लिफ्ट मागत असे. त्यावेळी तिच्या मनात संकोच आणि भीती असे. मात्र धीर करून ती ट्रकमधून कोचिंग सेंटरमध्ये जात असे. काही दिवसांनंतर हे ट्रक ड्रायव्हरही तिला ओखळू लागले होते. तसेच तिचे घर जवळ येताच ते लांबूनच हॉर्न वाजवत असत. त्यामुळे चानूला वेळीच तयार होऊन ट्रकपर्यंत पोहोचता येत असे.