चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंचा मेळावा भरला आहे. आज चौथ्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांवर आपले नाव कोरले. भारताला स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा आणि तिसऱ्या दिवशी तीन पदके मिळाली होती. एकूण २२ पदकांसह भारत पदकतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. यामध्ये पाच सुवर्ण, सात रौप्य आणि दहा कांस्य पदकांचा समावेश आहे. आज भारताने नेमबाजीत दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली.
दरम्यान, भारताच्या अनंत सिंगने नेमबाजीत देशासाठी आणखी एक पदक जिंकले आहे. त्याने लक्ष्यावर ६० पैकी ५८ शॉट्स मारले अन् रौप्य पदक मिळवले. त्याचवेळी कुवेतच्या अब्दुल्ला अल-रशिदी यांनी ६० पैकी ६० अचूक लक्ष्य साधत विश्वविक्रम केला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. विशेष बाब म्हणजे ६० वर्षीय कुवेतच्या अब्दुल्ला अल-रशिदी यांनी अचूक ६०/६० सह सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. रशिदी हे तीनवेळा वर्ल्ड चॅम्पियन देखील राहिले आहेत.