मुंबई : अनन्या दाबके आणि युवराज वधवानी या मुंबईकर खेळाडूंनी इंदोर येथे नुकताच झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर आणि ज्युनिअर स्क्वॉश स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली. त्याचवेळी निकिता आणि नील या जोशी भावंडांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.इंदोर येथील डेली कॉलेजमध्ये झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या १५ वर्षांखालील गटात चमकदार कामगिरी करताना अनन्याने स्पर्धेत अग्रमानांकीत असलेल्या दिल्लीच्या मेघा भाटियाला ७-११, १३-११, ९-११, ११-७, ११-५ असा धक्का दिला. पहिला गेम गमावल्यानंतरही अनन्याने झुंजार खेळ करताना मेघाच्या आव्हानातली हवा काढली.त्याचवेळी गतविजेत्या आणि अव्वल खेळाडू युवराजने आपले वर्चस्व कायम राखताना मुलांच्या ११ वर्षांखालील अंतिम सामन्यात तेलंगनाच्या रोहन आर्या गोंडीचा ११-२, ११-३, ११-६ असा फडशा पाडला. युवराजच्या आक्रमक पवित्र्यापुढे रोहनचा अखेरपर्यंत निभाव लागला नाही. दरम्यान नील आणि निकिता यांना मुला - मुलींच्या अनुक्रमे १५ व १७ वर्षांखालील गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गोव्याच्या अग्रमानांकीत यश फडतेविरुद्ध नीलला ६-११, ६-११, ४-११ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. तर, मुलींमध्ये निकिताचा तेलंगणाच्या अग्रमानांकीत अमिता गोंडीविरुध्द ६-११, ८-११, ११-४, ९-११ असा पराभव झाला. (क्रीडा प्रतिनिधी)
अनन्या, युवराज यांचा दबदबा
By admin | Published: November 03, 2016 4:08 AM