नवी दिल्ली : सेरेना विल्यम्स म्हणजे टेनिस विश्वातील दिग्गज महिला खेळाडू. सेरेनाने आपल्या खेळाच्या जोरावर भल्या भल्या टेनिसपटूंना कोर्टवर रडवलं आहे. पण सेरेनावरच टेनिस कोर्टवर ढसाढसा रडण्याची वेळ आली. पण सेरेनाच्या बाबतीत असं नेमकं घडलं तरी काय...
रॉजर्स कप या टेनिस स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना सुरु होता. अंतिम फेरीत सेरेनापुढे कॅनडाच्या बियांका एंड्रेस्कूचे आव्हान होते. पहिल्या सेटमध्ये बियांकाने पहिल्या १९ मिनिटांमध्येच ३-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर सेरेना रडायला लागली आणि तिने खेळ सोडून दिल्याचे पाहायला मिळाले.
बऱ्याच दिवसांनी सेरेना जेतेपद पटकावणार का, याची उत्सुकता चाहत्यांना होती. त्यामुळे या अंतिम फेरीत सेरेनाचा खेळ कसा होतो, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पहिल्या सेटमध्ये सेरेना पिछाडीवर होती. पण सेरेना दमदार पुनरागमन करेल, असा विश्वास तिच्या चाहत्यांना होता. पण सेरेनाने खेळ सोडून दिला आणि तिच्या चाहत्यांना धक्का बसला.
अंतिम फेरीचा १९ मिनिटांचा खेळ झाला. त्यानंतर सेरेनाच्या पाठीमध्ये दुखायला दाखले. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे सेरेनाला समजले. त्यामुळे तिने खेळ सोडून दिला. त्यामुळे सेरेनाला पराभूत न होताही जेतेपद गमवावे लागले.