- सुनील गावसकर -मुंबई संघाने प्लेआॅफमधील स्थान निश्चित केले असून आता गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी त्यांना उर्वरित सामने जिंकावे लागतील. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांना दोन संधी मिळू शकतील. मुंबई संघ अंतिम ११ खेळाडूंबाबत विशेष बदल करणार नाही, पण लेंडल सिमन्सने दिल्लीविरुद्ध आक्रमक खेळी करीत मुंबई संघाला अपेक्षित सुरुवात करून दिली आणि आपली उपयुक्तता सिद्ध केली. पोलार्डला फलंदाजी क्रमवारीत बढती देण्याचा मुंबई संघाचा निर्णय शानदार होता. पोलार्डने मिळालेल्या संधीचा लाभ घेत प्रदीर्घ कालावधीनंतर अर्धशतकी खेळी केली. मुंबई संघ गोलंदाजांच्या कामगिरीमुळे खूश असेल. त्यांनी दिल्ली संघाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. दिल्ली संघाने दोन दिवसांपूर्वीच २०८ धावांचे लक्ष्य सहज गाठले होते. त्या लढतीत दिल्ली संघाचे युवा फलंदाज संजू सॅमसन व ऋषभ पंत यांनी आक्रमक खेळी करीत क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले होते, पण मुंबईविरुद्धच्या लढतीत या दोन्ही फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. फॉर्म किती महत्त्वाचा आहे, याची या दोघांना कल्पना आली असेल. सर्वकाही सुरळीत होत असताना आपली विकेट बहाल करायची नाही, याचा धडा त्यांनी घेतला असेल, अशी आशा आहे. रायझिंग पुणे सुपरजायंटविरुद्ध हैदराबाद संघाने चुकीच्या वेळी विकेट गमावल्यामुळे त्यांना साध्य असलेले लक्ष्य गाठण्यात अपयश आले. वॉर्नर, धवन, विल्यम्सन, युवराज व हेन्रिक्स यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश असलेल्या हैदराबादसारख्या संघाला प्रतिषटक ७.५ च्या गतीने धावा फटकावणे कठीण नव्हते, पण मोक्याच्या क्षणी विकेट गमावल्यामुळे संघाला पराभव स्वीकारावा लागला. बेन स्टोक्सने सुरुवातीला शानदार खेळी केली आणि त्यानंतर महत्त्वाचे बळी घेतले, पण जयदेव उनाडकटने हॅट््ट्रिकसह पाच बळी घेतल्यामुळे स्टोक्सचा प्रभाव कमी झाला. जयदेव उनाडकट सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. फॉर्मात असलेल्या मुंबई संघाविरुद्ध हैदराबाद संघाला खेळाचा दर्जा उंचावण्याची गरज आहे. जेतेपदाचा बचाव करण्यासाठी सनरायझर्स संघाला कामगिरी सुधारावी लागेल. (पीएमजी)
...आणि उनाडकट ठरला सामनावीर
By admin | Published: May 08, 2017 12:39 AM