ऑनलाइन लोकमत
हेडिंग्ले, दि. २१ : पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेची दाणादाण उडवलेल्या जेम्स अँडरसन याने ५ बळी मिळविताना कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या नावावर नवा विक्रम नोंदविला. या शानदार कामगिरीसह अँडरसनने भारताचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज कपिल देव यांचा सर्वाधिक ४३४ बळींचा विक्रम मागे टाकून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्रमवारीत सहावे स्थान पटकावले.
लंकेविरुद्ध पहिल्या डावात ५ बळी घेताना अँडरसनने आपल्या बळींची संख्या ४३८ इतकी केली. सामन्यात कौशल सिल्वाला बाद करून अँडरसनने कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी केली, तर यानंतर अँजेलो मॅथ्यूजला बाद करून ही विक्रमी कामगिरी नोंदवली.
अँडरसनने आतापर्यंत 114 कसोटी सामन्यांत 29.18च्या सरासरीने 438 बळी घेतले आहेत. कपिल देव यांनी २२७ डावांमध्ये ४३४ बळी घेतले होते, तर अँडरसनने हीच कामगिरी २१३ डावांमध्ये केली. दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन असून, त्याने १३३ कसोटी सामन्यात तब्बल ८०० बळी घेतले आहेत. तर, भारताचा माजी दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे ६१९ बळींसह तिसऱ्या स्थानी आहे.