न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत १५वे मानांकनप्राप्त दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनने धक्कादायक निकाल नोंदवताना ब्रिटनच्या अँडी मरेचा पराभव केला, तर १७ वेळा ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या रॉजर फेडररने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. गेल्या ५ वर्षांत ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत मरे प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयशी ठरला. अँडरसनने तिसऱ्या मानांकित मरेचा ७-६, ६-३, ६-७, ७-६ असा पराभव केला. या पराभवामुळे मरेची सलग १८व्या वेळी ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची मालिका खंडित झाली. अँडरसन अमेरिकन ओपनमध्ये अंतिम आठमध्ये स्थान मिळविणारा वेन फरेरानंतरचा दक्षिण आफ्रिकेचा पहिला खेळाडू ठरला आहे. फरेराने २००२मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. दुसऱ्या मानांकित फेडररने १३वे मानांकन प्राप्त अमेरिकेच्या जॉन इस्नेरचा ७-६, ६-७, ७-५ असा पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. फेडररला उपांत्यपूर्व फेरीत १२वे मानांकन प्राप्त फ्रान्सच्या रिचर्ड गास्केतच्या अव्हानाला सामोरे जावे लागेल. गास्केतने सहाव्या मानांकित झेक प्रजासत्ताकाच्या थॉमस बर्डीचचा २-६, ६-३, ६-४, ६-१ असा पराभव केला. स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिन्काने अमेरिकेच्या डोनाल्ड यंगवर ६-४, १-६, ६-३, ६-४ अशी मात केली. महिला विभागात दुसरे मानांकन प्राप्त सिमोना हालेप आणि दोनदा विम्बल्डन चॅम्पियन पेत्रा क्वितोव्हा यांनी प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली. हालेपने २ तास ३८ मिनिटे रंगलेल्या लढतीत २४व्या मानांकित जर्मनीच्या सबाइन लिसिकीचा ६-७, ७-५, ६-२ असा पराभव केला. दोनदा आॅस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन असलेल्या व्हिक्टोरिया अजारेन्काने अमेरिकेच्या वारवरा लेपचेंकोविरुद्ध ६-३, ६-४ अशी सरशी साधून अंतिम ८ खेळाडूंमध्ये स्थान निश्चित केले.(वृत्तसंस्था)
अँडरसनचा मरेला धक्का
By admin | Published: September 09, 2015 2:38 AM