ऑनलाइन लोकमत
वेलिंग्टन, दि. १९ : भारताविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या पाच सामन्यांच्या वन-डे आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी न्यूझीलंडने संघ जाहीर केला असून अष्टपैलू कोरी अँडरसनला संघात स्थान दिले आहे. तो स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून संघात खेळणार आहे. टाचेच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आऊट झालेला अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीला १५ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे तर कसोटी संघात समावेश असलेल्या निकोल्सला संघात स्थान मिळू शकले नाही. १६ आॅक्टोबरपासून धर्मशालामध्ये प्रारंभ होत असलेल्या मालिकेसाठी फलंदाज एंटन डेवसिच, अष्टपैलू जिमी निशाम व यष्टिरक्षक बीजे वॉटलिंग यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
अँडरसन यापूर्वी न्यूझीलंडतर्फे अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना भारतात झालेल्या विश्व टी-२० स्पर्धेदरम्यान खेळला होता, पण त्यानंतर पाठदुखीमुळे झिम्बाब्वे व दक्षिण आफ्रिका दौऱ्याला त्याला मुकावे लागले. गेल्या आठवड्यात त्याने ख्राईस्टचर्चमध्ये एमर्जिंग इलेव्हनविरुद्ध न्यूझीलंड इलेव्हनतर्फे तीन सामने खेळत फिटनेस सिद्ध केला होता. न्यूझीलंड क्रिकेटचे निवड समिती सदस्य गेव्हिन लॉर्सन यांनी अँडरसनच्या फिटनेससाठी प्रशंसा केली. मिशेल मॅक्लेघान, अॅडम मिल्ने, कोलिन मुन्रो व जॉर्ज वर्कर दुखापतग्रस्त असल्यामुळे निवडसाठी उपलब्ध नव्हते.
न्यूझीलंड वन-डे संघकेन विलियम्सन (कर्णधार), कोरी अँडरसन, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, एंटन डेवसिच, मार्टिन गुप्तील, मॅट हेन्री, टॉम लॅथम, जेम्स नीशाम, ल्युक रोंची, मिशेल सेंटनर, ईश सोढी, टीम साऊदी, रॉस टेलर व बीजी वॉटलिंग.