पॅरिस : ब्रिटनच्या अॅण्डी मरेने शुक्रवारी क्रोएशियाचा उंच चणीचा खेळाडू इव्हो कार्लोव्हिचचा पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले, तर महिला विभागात दोनवेळा विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या पेत्रा क्वितोव्हाला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. तीनदा उपांत्य फेरी गाठणाऱ्या मरेला गेल्या तीन दिवासांमध्ये दोनदा निर्णायक सेटपर्यंत झुंज द्यावी लागली; पण शुक्रवारी मात्र या २९ वर्षीय खेळाडूने दोन तासांमध्ये कार्लोव्हिचचा ६-१, ६-४, ७-६ ने पराभव केला. क्रोएशियन खेळाडूविरुद्ध मरेने सातव्या सामन्यातही विजयाची मालिका कायम राखली. मरेला आता अमेरिकेच्या जॉन इस्नर व रशियाचा तेमुराज गाबाशविली यांच्यातील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. आठव्या मानांकित कॅनडाच्या मिलोस राओनिचने दुखापतीतून सावरताना स्लोव्हियाच्या ओंद्रेज मार्टिनचा पराभव करीत दुसऱ्यांदा अंतिम १६ खेळाडूंत स्थान मिळवले. राओनिचने तिसऱ्या सेटच्या सुरुवातीला वैद्यकीय मदत घेतली होती. त्याने या लढतीत ७-६, ६-२, ६-३ ने सरशी साधली. जानेवारी महिन्यात आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारल्यानंतरही त्याला अशा प्रकारच्या दुखापतीला सामोरे जावे लागले होते. २०१४ मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या राओनिचला आता क्रमवारीत ५५ व्या स्थानावर असलेल्या एलबर्ट रामोस-विनोलासच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. विनोलासने २३ व्या मानांकित अमेरिकेच्या जॅक सोकचा ६-७, ६-४, ६-४, ४-६, ६-४ ने पराभव केला. महिला विभागात चौथे मानांकन प्राप्त व गेल्या वर्षी विम्बल्डनमध्ये उपविजेती ठरलेल्या स्पेनच्या गार्बिने मुगुरुजाने अंतिम ९ गेम जिंकत बेल्जियमच्या यानिना विकमेरयरचा ६-३, ६-० ने पराभव केला. (वृत्तसंस्था)१० वे मानांकन प्राप्त चेक प्रजासत्ताकची क्वितोव्हा तिसऱ्या फेरीपर्यंत गाशा गुंडाळणारी अव्वल १० मध्ये मानांकन असलेली चौथी खेळाडू ठरली आहे. क्वितोव्हाला अमेरिकेच्या शेल्बी रोजर्सविरुद्ध ०-६, ७-६, ०-६ ने पराभव स्वीकारावा लागला. क्वितोव्हाने या लढतीत ३६ टाळण्याजोग्या चुका केल्या, तर क्रमवारीत १०८ व्या स्थानावर असलेल्या २३ वर्षीय खेळाडू रोजर्सने प्रथमच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत अंतिम १६ मध्ये स्थान मिळवले. रोजर्सला यानंतर २५ व्या मानांकित रोमानियाच्या इरिना कॅमेलिया बेगुच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. भारताचा लिएंडर पेस व रोहन बोपन्ना यांनी शुक्रवारी आपापल्या सहकाऱ्यांसह फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. बोपन्ना व फ्लोरिन मर्जिया या सहाव्या मानांकित जोडीने दुसऱ्या फेरीत ग्रेगोयर बेरेर व क्विंटन हेरिस या फ्रान्सच्या जोडीचा ६-३, ६-४ ने पराभव केला. पेस व पोलंडचा त्याचा सहकारी मार्सिन माटकोवस्की यांनी दुसऱ्या फेरीच्या लढतीत आॅस्ट्रियाचा ज्युलियन नोल्स व जर्मनीचा फ्लोरिन मेयर या जोडीचा ६-४, ६-३ ने पराभव केला.
अॅण्डी मरेची कार्लोव्हिचवर मात
By admin | Published: May 28, 2016 3:57 AM