लंडन : सध्या आपल्या फॉर्मशी झगडत असलेल्या जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू ब्रिटनच्या अँडी मरेला ३ जुलैपासून सुरु होत असलेल्या प्रतिष्ठेच्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी अव्वल मानांकन लाभले आहे. गेल्या आठवड्यात क्वीन्स स्पर्धेत मरेला आॅस्टे्रलियाच्या जॉर्डन थॉम्पसनविरुध्द पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. त्याचवेळी, विम्बल्डनमध्ये अव्वल मानांकन मिळाल्यानंतर उपांत्य फेरीपर्यंत मरेला आघाडीच्या चार खेळाडूंविरुद्ध खेळावे लागणार नाही हे निश्चित झाले आहे.गेल्या काही स्पर्धांमध्ये लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला आणखी एक नामांकित खेळाडू नोवाक जोकोविच, सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला टेनिस दिग्गज रॉजर फेडरर आणि यंदाचा फ्रेंच ओपन विजेता राफेल नदाल यांचा अव्वल चार खेळाडूंमध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे २०१४च्या विम्बल्डननंतर पहिल्यांदाच हे चारही बलाढ्य खेळाडू पहिल्या चार क्रमांकावर विराजमान आहेत. विम्बल्डन आयोजकांच्या सवयीप्रमाणे जागतिक क्रमांकाच्या आधारे मानांकन न देण्याचा फायदा जोकोविच आणि फेडरर यांना झाला आहे. जोकोविच जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे, मात्र त्याला स्पर्धेत दुसरे मानांकन मिळाले आहे. त्याचप्रमाणे, जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या फेडररला स्पर्धेत तिसरे मानांकन मिळाले आहे. दरम्यान, नदालला मात्र फटका बसला आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असूनही नदालला स्पर्धेत चौथे मानांकन मिळाले आहे. दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंकाला विम्बल्डनमध्ये पाचवे मानांकन मिळाले आहे. महिला गटात स्टार खेळाडू सेरेना विलियम्सची उणीव टेनिस चाहत्यांना भासेल. गर्भवती असल्यामुळे सेरेना सध्या टेनिसपासून दूर आहे. जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू आणि गतउपविजेती जर्मनीची एंजलिक कर्बरला स्पर्धेत अव्वल मानांकन लाभले आहे. तसेच, रोमानियाची फ्रेंच उपविजेती सिमोना हालेप, झेक प्रजासत्ताकची कॅरोलिन पिलिस्कोवा आणि युक्रेनची एलिना स्वितोलिना यांचा अव्वल चार मानांकनामध्ये समावेश आहे. (वृत्तसंस्था)
अँडी मरेला अव्वल मानांकन
By admin | Published: June 29, 2017 12:44 AM