Imane Khelif vs Angela Carini, Paris Olympics 2024 Controversy: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बुधवारचा दिवस भारतीय क्रीडाप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी खास ठरला. भारतातील कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने नेमबाजीत कांस्य पदक पटकावले. खाशाबा जाधव (१९५२) यांच्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नीलच्या रुपाने महाराष्ट्राला वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळाले. महाराष्ट्रासह भारतभर ही चर्चा सुरु असतानाच, ऑलिम्पिकमध्ये मात्र बुधवारचा दिवस हा एका वेगळ्याच कारणाने गाजला. एका बॉक्सिंग मॅचमध्ये अवघ्या ४६ सेकंदात एका स्पर्धकाने सामन्यातून माघार घेतली. त्यानंतर त्या स्पर्धकाने जो दावा केला त्यातून सध्या जगभरात आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वाद सुरु झाला आहे.
अवघ्या ४६ मिनिटांत माघार का?
अँजेला कॅरिनी हिने सामन्यातून माघार घेतल्यानंतर तिला या निर्णयाबाबत विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली की, मला इमेन खलिफने इतक्या जोरात पंच मारला, जो माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत कुणीच मारलेला नव्हता. तो पंच इतका जोरदार होता की अँजेलाच्या हनुवटीवर आघात झाला आणि काही क्षणातच तिने खेळ सोडला.
नक्की काय आहे वाद?
ऑलिम्पिक स्पर्धेत आज ६६ किलो वजनी गटात महिलांच्या सामन्यात इटलीची अँजेला कॅरिनी आणि अल्जेरियाची इमेन खेलिफ या बॉक्सिंग रिंगमध्ये भिडल्या. या दोघींमधील सामन्यात कोण जिंकणार याचा विचार काहीही कळायच्या आतच लागला. सामना सुरु होताच अवघ्या ४६ सेकंदात सामना थांबवला गेला. इटलीच्या अँजेलाने सामन्यातून माघार घेतली आणि अल्जेरियाची इमेन विजयी झाली.
वाद कशावरून रंगला?
बॉक्सर इमेन खलिफ ही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याचे मुख्य कारण म्हणजे, लैंगिक पात्रता चाचणीतील अनुत्तीर्णता. गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या महिलांच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इमेन ही टेस्टोस्टेरॉन आणि जेंडर एलिजिबीलिटी टेस्ट मध्ये अपात्र ठरली होती. त्यामुळेच तिला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आले होते. असे असूनही ऑलिम्पिकमध्ये तिला सहभागी होण्याची परवानगी का देण्यात आली? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
---
---
आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत सहभागी होण्याआधी ठराविक चाचण्या पार कराव्या लागतात. त्यापैकी एक असलेली लैंगिक पात्रता चाचणी ही शरीरातील टेस्टोस्टेरॉन व इतर घटकांबाबतची चाचणी असते. यावरून एखादा स्पर्धक महिलांच्या स्पर्धेत खेळण्यास पात्र आहे की नाही, ते ठरवण्यात येते. इमेन खलिफ हिने त्या टेस्टमध्ये आवश्यक ते निकष पूर्ण केले नव्हते त्यामुळे तिला सुवर्णपदकाच्या सामन्याआधी स्पर्धेबाहेर करण्यात आले होते.