मुंबई : नवोदित मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत उतरण्यापूर्वी ज्या शरीरसौष्ठवपटूचं कुणी नावही ऐकलं नव्हतं... मुंबई श्री स्पर्धेत तो खेळणार की नाही, याची कुणाला माहितीही नव्हती... असा हर्क्युलस जिमचा अनिल बिलावा भारतातील सर्वात प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उतरला आणि त्याने संभाव्य विजेत्यांवर सहजगत्या मात करून स्पार्टन मुंबई श्रीचे जेतेपद निर्विवाद जिंकण्याचा पराक्रम केला. मुंबई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात आजवर एकाच मोसमात नवोदित मुंबई श्री जिंकल्यानंतर मुंबईच्या बाहुबलींना नमवून मुंबई श्री जिंकणारा अनिल बिलावा हा पहिलाच शरीरसौष्ठवपटू ठरला आहे. अनिल बिलावाने सलग दोन स्पर्धा जिंकून एक नवा आणि अत्यंत दुर्मिळ असा इतिहास रचला. तसेच महिलांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात पीळदार सौंदर्यवतीच्या मिस मुंबई स्पर्धेत एफएसटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली तर पुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकाराच्या 170 सेंमी उंचीच्या गटात आरकेएमचा महेश गावडे तर 170 सेंमीवरील उंचीच्या गटात बाल मित्र व्यायामशाळेचा शुभम कांदू अव्वल आला. बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई उपनगर बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशनने दिलेल्या आयोजनाच्या संधीचं आरोग्य प्रतिष्ठानने सोनं केलं. त्यांनी केलेल्या भव्य-दिव्य आणि दिमाखदार आयोजनामुळे स्पार्टन मुंबई श्रीचं वातावरण आंतरराष्ट्रीय दर्जाचं झालं होतं. त्यानिमित्तानं एक जिल्हास्तरीय स्पर्धलाही आंतरराष्ट्रीय दर्जाचं ग्लॅमर देऊ शकतो, हे आरोग्य प्रतिष्ठाननं दाखवून दिलं. मुंबईकर आणि शरीरसौष्ठवपटूंच्या फिटनेससाठी प्रथमच आयोजित केलेला मुंबई फिटनेस सोहळा तब्बल पाच हजारांपेक्षा अधिक क्रीडाप्रेमींच्या गर्दीमुळे ब्लॉकबस्टर हिट ठरला.
रविवारची संध्याकाळ लालबाग-परळकरच नव्हे तर समस्त मुंबईकरांसाठी संस्मरणीय ठरली. परळच्या रेल्वे वर्कशॉपच्या मैदानात मुंबईकरांना शरीरसौष्ठवाचे सौंदर्य आणि थरार एकाच वेळी अनुभवता आले. एकंदर नऊ गटातील 48 खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते. काल तब्बल 168 खेळाडूंमधून मोती निवडावे तसे निवडलेल्या 48 खेळाडूंना पाहून मुंबई श्रीचा दर्जा एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेपेक्षा किंचीतही कमी नसल्याचा प्रत्यय आला. प्रत्येक गटात अव्वल स्थान पटकावण्यासाठी सहाही खेळाडूंना प्रचंड संघर्ष करावा लागला, हेच या स्पर्धेचं यश होतं. प्रत्येक गटात गटविजेता निवडताना जजेसना तारेवरची कसरत करताना कंपेरिजन घ्यावी लागली. 55 किलो वजनी गटात वक्रतुंड जिमच्या नितीन शिगवणने माँसाहेब जिमच्या जितेंद्र पाटीलवर मात केली. 60 किलो वजनी गटात परब फिटनेसच्या देवचंद गावडेचे कडवे आव्हान आर.एम.भटच्या अविनाश वनेने मोडून काढले. वसंत जिमचा उमेश गुप्ता 65 किलो वजनी गटात सरस ठरला. त्याने अनुभवी संदेश सकपाळला मागे टाकले तर 70 किलो वजनी गटात बाल मित्र व्यायामशाळेच्या रोहन गुरवने संदीप कवडे, महेश पवारपेक्षा सरस सौष्ठवाचे प्रदर्शन करीत गटविजेतपदावर आपले नाव कोरले. 75 किलो वजनी गटात ग्रेस जिमच्या भास्कर कांबळीने आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. सुशील मुरकरचे गणित चुकले गेल्या तीन महिन्यात धारावी श्री, दहिसर श्री, शंकर श्री, साहेब श्री,पुंचिकोरवे श्री अशा सलग पाच स्पर्धा जिंकणारा सुशील मुरकरच यंदाच्या मुंबई श्रीचा संभाव्य विजेता वाटत होता. पण वजन तपासणीच्या वेळी अचानक आलेला अनिल बिलावा 80 किलो वजनी गटात खेळला आणि 81किलो वजन असलेला सुशीलही एक किलो कमी करून त्याच गटात खेळला. बिलावाबद्दल कसलीही कल्पना नसल्यामुळे सुशीलचे 80 किलो वजनी गटात खेळल्याचे गणित चुकले आणि तो बिलावाकडून गटातच बाद झाला. खरं सांगायचं तर बिलावानंतर मुंबई श्रीमध्ये सुशीलच सर्वोत्तम शरीरसौष्ठवपटू होता. जर सुशील 85 किलो वजनी गटात खेळला असता तर तो गटविजेता ठरला असता आणि त्याने 50 हजार रूपयांचे उपविजेतेपदही संपादले असते.80 किलो वजनी गटात अनिल इतक्या जबरदस्त तयारीत होता की प्राथमिक चाचणीतच त्याचे जेतेपद निश्चित झाले होते. आज त्याने फक्त मुंबई श्रीचा ऐतिहासिक चषक उंचावण्याची औपचारिकता पूर्ण केली. या स्पर्धेतून मार्च महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र श्रीसाठी 12-12 खेळाडूंचे मुंबईचे दोन संघही निवडण्यात आल्याची माहिती मुंबई संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली. मिसेस भावसार ठरली मिस मुंबईपीळदार सौंदर्यवतीच्या मिस मुंबई स्पर्धेत एफएसटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली. गतवर्षी अवघ्या दोन स्पर्धकांमुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र यावेळी आरोग्य प्रतिष्ठानने अत्यंत अभूतपूर्वरित्या आयोजित केलेल्या महिलांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकाराला सात खेळाडूंचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे लक्षवेधी झालेल्या या स्पर्धेत मंजिरीने तळवलकर्सच्या हीरा सोलंकीवर मात करीत आपले पहिलेवहिले मिस मुंबई जेतेपद संपादले. विशेष म्हणजे दहा वर्षाच्या शौर्यची आई असलेल्या मंजिरीने आपल्या नवऱ्याने दिलेल्या प्रोत्साहनाच्या जोरावर ही स्फूर्ती देणारी किमया करून दाखविली. गेल्या दोन वर्षांपासून घेतलेली मेहनत आणि माझ्या भूषनने दिलेल्या पाठबळामुळे मला हे शक्य झाल्याची मंजिरीची पहिली प्रतिक्रिया होती. मिस मुंबई ही माझी पहिली पायरी आहे. मला माझ्या भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचवायचे आहे. त्यासाठी लागणाऱ्या मेहनतीसाठी आणि आव्हानांसाठी मी सज्ज आहे. या स्पर्धेत तळवलकर्स जिमची हीरा सोलंकी उपविजेती ठरली. तर 52 वर्षांची तरूणी निशरिन पारिख तिसरी आली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सात महिला स्पर्धकांच्या प्रदर्शनाला उपस्थित महिलांनी भरभरून दाद दिली. तसेच या स्पर्धेत चंदिगड येथे झालेल्या फेडरेशन कप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या अमला ब्रम्हचारी आणि श्रद्धा डोके या मऱहाटमोळ्या पीळदार शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या सौष्ठव प्रदर्शनाने उपस्थितांची मनं जिंकली.
या दिमाखदार स्पर्धेचा पुरस्कार सोहळा व्यायाममहर्षी मधुकरराव तळवलकर, भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस चेतन पाठारे, महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे प्रशांत आपटे, मुंबई शरीरसौष्ठव संघटनेतील दिग्गज अमोल कीर्तीकर, अजय खानविलकर, मदन कडू, राजेश सावंत, सुनील शेगडे , शरीरसौष्ठवपटूचे स्फूर्तिस्थान श्याम रहाटे, मनीष आडविलकर, आरोग्य प्रतिष्ठानचे किरण कुडाळकर, प्रभाकर कदम, राजेश निकम ,माजी खासदार संजय पाटील आणि स्पार्टन न्यूट्रिशनचे प्रमुख वृषभ चोकसी यांच्या उपस्थितीत पार पडला. मुंबई श्री 2019 च्या अंतिम फेरीचा निकाल55 किलो वजनी गट ः 1. नितीन शिगवण (वक्रतुंड), 2. जितेंद्र पाटील(माँसाहेब), 3. राजेश तारवे (माँसाहेब), 4. नितेश कोळेकर (परब फिटनेस), 5. अजिंक्य पवार (बाळ व्यायाम मंदिर), 6. ओंकार आंबोकर (बॉडी वर्कशॉप)60 किलो ः 1. अविनाश वने (आर.एम.भट), 2. देवचंद गावडे (परब फिटनेस), 3. आकाश घोरपडे (करमरकर जिम),4. अरूण पाटील (जय भवानी), 5. चेतन खारवा (माँसाहेब), 6. तुषार गुजर (माँसाहेब)65 किलो ः 1. उमेश गुप्ता (वसंत जिम), 2. संदेश सकपाळ (परब फिटनेस), 3. जगदिश कदम (बॉडी वर्कशॉप), 4. बप्पन दास ( आरकेएम), 5.साजिद मलिक (फ्युचर फिटनेस), 6. निलेश घडशी (बॉडी वर्कशॉप)70 किलो ः 1. रोहन गुरव (बाल मित्र व्यायामशाळा), 2. संदीप कवडे (एच.एम.बी. जिम), 3. महेश पवार (हर्क्युलस जिम), 4. मनोज मोरे (बाल मित्र व्यायामशाळा), 5. विशाल धावडे (बाल मित्र व्यायामशाळा), 6. गणेश पेडामकर ( बॉडी वर्कशॉप)75 किलो ः 1. भास्कर कांबळी (ग्रेस जिम), 2. मोहम्मद हुसेन (परब फिटनेस), 3. अमोल गायकवाड (मिशन फिटनेस), 4. अर्जुन पुंचिकुरवे(गुरूदत्त व्यायामशाळा), 5. लीलाधर म्हात्रे (कृष्णा जिम), 6. आशिष लोखंडे(रिसेट फिटनेस).80 किलो ः 1. अनिल बिलावा (हर्क्युलस जिम), 2. सुशील मुरकर(जे.एम.के.एम), 3. सुशांत रांजणकर (आर.एम.भट), 4. मोहम्मद शब्बीर शेख (परब फिटनेस), 5. सुयश पाटील (इन्सेन फिटनेस), 6. अभिषेक खेडेकर(पंपिंग आर्यन)85 किलो ः 1. सकिंद्र सिंग (फॉर्च्युन फिटनेस),2. दिपक तांबीटकर (रिजस फिटनेस), 3. उबेद पटेल (बिस्ट हाऊस जिम), 4. सुबोध यादव (बॉडी वर्कशॉप), 5. रोमियो बॉर्जेस (परब फिटनेस), 6. निशांत कोळी (वेगस जिम),90 किलो ः 1. महेश राणे (बालमित्र जिम), 2. प्रसाद वाळंज ( बॉडी वर्कशॉप ), 3. विजय यादव (परब फिटनेस),90 किलोवरील 1. निलेश दगडे (परब फिटनेस), 2. रविकांत पाष्टे (परब फिटनेस)स्पार्टन मुंबई श्री 2019: अनिल बिलावा ( हर्क्युलस जिम), उपविजेता ः भास्कर कांबळी (ग्रेस जिम), तृतीय क्रमांक ः नीलेश दगडे (परब फिटनेस),बेस्ट पोझर - अभिषेक खेडेकर (पंपिंग आर्यन), सर्वोत्तम प्रगतीकारक खेळाडू- सकिंदर सिंग ( फॉर्च्युन फिटनेस).फिजीक स्पोर्टस् (पुरूष-170 सेंमी) ः 1. महेश गावडे ( आर.के.एम.), 2.विजय हाप्पे (परब फिटनेस),3. प्रथमेश बागायतकर (परब फिटनेस),4.अनिकेत चव्हाण (रिजिअस जिम),5. मोहम्मद इजाझ खान (आर.के.एम.), 6.लवेश कोळी ( गुरूदत्त व्यायामशाळा). फिजीक स्पोर्टस् (पुरूष-170 सेंमीवरील) ः 1. शुभम कांदू ( बालमित्र व्यायामशाळा), 2.आतिक खान ( फॉर्च्युन फिटनेस), 3. स्वराज सिंग ( मेंगन जिम), 6. अनिकेत महाडिक ( हर्क्युलस जिम ), 4. मिमोह कांबळे ( न्यूयॉर्क जिम), 5. प्रणिल गांधी (फॉर्च्युन फिटनेस),मिस मुंबई (विमेन्स फिजीक स्पोर्टस्)ः 1. मंजिरी भावसार (एफएसटी जिम), 2. हीरा सोलंकी (तळवलकर्स जिम), 3. निशरीन पारीख, 4. रेणूका मुदलीयार(आर.के. फिटनेस),5. वीणा महाले (बॉडी वर्कशॉप ), 6. प्रतीक्षा करकेरा(बालमित्र व्यायामशाळा)