ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील कथित वाद प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटविश्व ढवळून निघत असतानाच, कुंबळेने आपल्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांपासून सर्व ठिकाणी फक्त याच मुद्द्यावर चर्चा होत आहे. आनिल कुंबळेने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या राजीनाम्याचं कारणही सांगितलं. मात्र अद्याप विराट कोहलीने आपली बाजू मांडलेली नाही. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौ-यावर आहे. दोघांमध्ये असलेले प्रचंड मतभेद यासाठी कारणीभूत ठरल्याचं समोर आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल कुंबळे खेळाडूंना शाळकरी मुलांप्रमाणे वागवायचा असा खेळाडूंचा आरोप आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत पाकिस्तानकडून झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघाचं मनौधेर्य खचलं असताना अनिल कुंबळेने संघाला पाठिंबा देण्याऐवजी चांगलंच झाडलं. आधीच पराभवामुळे खच्ची झालेल्या संघाला प्रशिक्षक आपल्याला खेळाडूप्रमाणे न वागवता, लहान मुलांप्रमाणे वागवत असल्याचं वाटत होतं. ज्याप्रकारे अनिल कुंबळे यांनी खेळाडूंशी संवाद साधला, त्यावरुन विराट कोहली नाराज झाला होता.
भारतीय संघाच्या कर्णधाराला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप असल्याचा आरोप अनिल कुंबळेने पायउतार होताना केला आहे. फेसबूक आणि ट्विटरवर एक पोस्ट करत जंबोने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये जंबो म्हणतो, गेले वर्षभर मी टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून यशस्वी होण्याचं श्रेय कर्णधार, संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफला देतो. माझ्या प्रशिक्षणाच्या स्टाईलवर आणि मी मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहण्यावर कर्णधाराचा आक्षेप असल्याचं काल पहिल्यांदाच मला बीसीसीआयकडून समजलं. मी कायमच कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या सीमा ओळखून काम करत असल्याने मला धक्का बसला आहे.
कुंबळेंनी पुढे म्हटले, बीसीसीआयने आमच्यातील मतभेद आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र मला असं वाटतं की आता हे पद सोडण्याची वेळ आली आहे. प्रशिक्षकपदाची धुरा बीसीसीआय ज्या व्यक्तीला पात्र समजेल, त्याच्याकडे सुपूर्द करण्याची मी विनंती करतो.
दोघांमध्ये अनेक गोष्टींवरुन वाद सुरु होते. विशेष म्हणजे दोघांमध्येही गेल्या सहा महिन्यांपासून अबोला होता. कोहली आणि कुंबळेनं गेल्या वर्षी डिसेंबर 2016मध्ये इंग्लंड टेस्ट सीरिज संपल्यानंतर एकमेकांशी बोलणं थांबवलं होतं. दोघांमध्ये वाद होता ते माहीत होतं. मात्र ते 6 महिने एकमेकांशी बोलत नसल्यानं आम्हीसुद्धा अचंबित झालो, असंही बीसीसीआयच्या एका अधिका-यानं सांगितलं आहे. रविवारी भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या अंतिम सामन्यानंतर दोघांमध्ये एक बैठक झाली आणि एकमेकांसोबत काम करण्यास इच्छुक नसल्याचं दोघांनाही समजलं. अनिल कुंबळेला वादामागील कारण विचारण्यात आलं तेव्हा त्यानं विराटची कोणतीही समस्या नाही. पण माझ्या काम करण्याच्या पद्धतीवर कोहलीला आक्षेप असल्याचं कुंबळेनं सांगितलं, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच विराटला वाटायचं की, स्वतः क्षेत्रातही अनिल कुंबळे हस्तक्षेप करतोय. कुंबळे स्वतःचा सल्ला नेहमीच कोहलीला देत होता. मात्र कोहलीला त्याचा तो सल्ला स्वतःच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केल्यासारखा वाटायचा, असंही बीसीसीआयच्या अधिका-यानं सांगितलं आहे.