दुबई : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या वन-डे सामन्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याचा आयसीसी क्रिकेट ‘हॉल आॅफ फेम’मध्ये समावेश करण्यात येणार आहे़ या प्रतिष्ठित यादीत समावेश होणारा तो ७७ वा सदस्य असेल़आयसीसी क्रिकेट समितीचा अध्यक्ष असलेला कुंबळे ‘हॉल आॅफ फेम’मध्ये समावेश होणारा चौथा भारतीय खेळाडू असेल़ यापूर्वी बिशनसिंह बेदी, कपिलदेव आणि सुनील गावसकर यांचा समावेश करण्यात आला होता़ कुंबळेसोबतच सर्वकालीन सर्वोत्कृष्ट आॅस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू बॅटी विल्सन हिचासुद्धा ७८ व्या सदस्याच्या रूपात ‘हॉल आॅफ फेम’मध्ये समावेश करण्यात येईल़ कुंबळेने ६१९ कसोटी बळी व वन-डेत ३३७ विकेट्स मिळविल्या आहेत़ २००७-०८ मध्ये कुंबळेने १४ कसोटीत देशाचे नेतृत्व केले होते़ त्यात ३ विजय, तर ५ कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला होता़ कुंबळे याने कसोटीतील एका डावात १० बळी मिळविण्याची किमया साधली आहे़ (वृत्तसंस्था)
अनिल कुंबळे ‘हॉल आॅफ फेम’मध्ये
By admin | Published: February 20, 2015 1:47 AM