ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 20 - भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात रंगलेल्या शीतयुद्धानंतर अखेर आज अनिल कुंबळेने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्यावर्षी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणाऱ्या अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाची कामगिरी दमदार झाली होती. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात मतभेद झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, अनिल कुंबळेने स्वत:सह खेळाडूंच्या मानधनात मोेठी वाढ करण्याची मागणी केल्याने त्याचे आणि बीसीसीआयचे संबंध ताणले गेले होते. त्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला होता. अखेर आज कुंबळेने राजीनामा देत भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीला पूर्णविराम दिला. आज भारतीय क्रिकेट संघ लंडनहून वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना झाला. मात्र आयसीसीच्या समितीच्या बैठकीचे निमित्त करून कुंबळेने भारतीय संघासोबत जाणे टाळले होते. त्यामुळे आज दुपारपासूनच अनिल कुंबळे संघाचे प्रशिक्षकपद सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. कुंबळेशी असलेला मुख्य प्रशिक्षकपदाचा करार संपल्यानंतर मुदतवाढ घेण्यास कुंबळेने नकार दिला होता. त्यानंतर त्याने बीसीसीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे राजीनामा पाठवला.
कुंबळेची प्रशिक्षकपदाची मुदत यापूर्वीच संपल्याने तसेच अद्याप नव्या मुख्य प्रशिक्षकाची निवड न झाल्याने बीसीसीआयच्या सल्लागार समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळण्याची विनंती कुंबळेला केली होती. मात्र कुंबळेने आजच प्रशिक्षकपद सोडल्याने वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघासोबत जाण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील संबंध अधिकच बिघडले होते. विराटने कोणत्याही परिस्थितीत कुंबळेसोबत जुळवून घेणार नसल्याचे क्रिकेट सल्लागार समितीसोबत झालेल्या बैठकीत म्हटले होते. आता कुंबळेने पद सोडल्यानंतर भारताचा नवा प्रशिक्षक कोण होईल, याची उत्सुकला क्रिकेटप्रेमींना लागली आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी वीरेंद्र सेहवागसह अनेक माजी क्रिकेटपटू शर्यतीत आहेत.