रांची : माजी महान फिरकीपटू व भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी डाव्या हाताने गोलंदाजी करीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत स्टीव्ह ओकीफेने उभे केलेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी चेतेश्वर पुजाराची मदत केली. पुणे कसोटीत अपयशी ठरल्यानंतर पुजाराने आपल्या खेळावर कसून मेहनत घेतली. त्याने त्यासाठी कुंबळे व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांची मदत घेतली. पुणे कसोटी सामन्यात ओकीफेच्या माऱ्याला सामोरे जाताना अडचण भासत होती. त्याने त्या लढतीत ७० धावांच्या मोबदल्यात १२ बळी घेतले होते. कारकिदीर्तील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. भारतीय फलंदाजांपुढे असलेल्या आव्हानाचा विचार करीत प्रशिक्षक कुंबळे यांनी सरावादरम्यान पुजाराला डाव्या हाताने फिरकी मारा केला. १६ मार्चपासून प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी बोलताना पुजारा म्हणाला, ‘आॅस्ट्रेलिया संघात डावखुरा फिरकीपटू असल्यामुळे सरावादरम्यान अनिल कुंबळे यांनी त्याच्याप्रमाणे मारा करण्याचा प्रयत्न केला. ते क्रीजच्या कोनातून गोलंदाजी करीत होते. चेंडू वळेल यासाठीही ते प्रयत्नशील होते.’पुजारा पुढे म्हणाला, ‘मी त्या कोनाची सवय करण्यासाठी प्रयत्नशील होतो. श्रीधर ‘ओव्हर द स्टंप’ गोलंदाजी करीत होते. ते आखुड टप्प्याचा माराही करीत होते. दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान हा सराव उपयुक्त ठरला. श्रीधर यांनी दिलेल्या सरावाचा चांगला लाभ झाला. अनिल कुंबळे यांनीही सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला. ते उजव्या हाताने गोलंदाजी करतात, पण त्यांनी डाव्या हाताने फिरकी मारा करण्याचा प्रयत्न केला. सरावादरम्यान हे सर्व काही सकारात्मक होते.’सरावादरम्यान महान फिरकीपटू कुंबळे पुजारापुढे आव्हानही निर्माण करण्यात यशस्वी ठरले. याबाबत पुजारा म्हणाला, ‘त्यांनी माझ्यापुढे आव्हान निर्माण केले. कुठे गोलंदाजी करायची, याची त्यांना चांगली कल्पना आहे. खरबडीत जागेवर ते चेंडूचा टप्पा ठेवत होते आणि चेंडू बाहेर काढत होते. त्यापासून बचाव करण्यात मी अपयशी ठरलो.’ स्टार्कबाबत बोलताना पुजारा म्हणाला, ‘स्टार्क ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. तो फलंदाजापासून दूर मारा करण्यासाठी प्रयत्नशील असतो. आम्ही त्याचा हा मारा यशस्वीपणे खेळण्यासाठी प्रयत्नशील होतो.’ (वृत्तसंस्था)- पुजारा पुणे कसोटी सामन्यात डावखुरा फिरकीपटू ओकीफे व वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क यांच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. पुजाराने बंगलोर कसोटीत दुसऱ्या डावात ९२ धावांची खेळी करीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने या लढतीत सरशी साधताना मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
पुजाराच्या अडचणीवर अनिल कुंबळेचा तोडगा
By admin | Published: March 11, 2017 4:08 AM